राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुनील चाबुकस्वार यांची उचलबांगडी करून ज्ञानेश्वर कांबळे यांची वर्णी लावण्यात आली. हे खांदेपालट करताना चाबुकस्वार यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आल्याने ते प्रचंड संतापले असून राष्ट्रवादीचेच आमदार अण्णा बनसोडे व शहराध्यक्ष योगेश बहल यांनी उपमख्यमंत्री अजित पवार यांची दिशाभूल करून आपली ‘राजकीय गेम’ वाजवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गजभिये यांनी कांबळे यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर शहराध्यक्ष बहल यांच्या उपस्थितीत त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. कांबळे हे चर्मकार समाजाचे सक्रिय कार्यकर्ते असून बहल यांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादीच्या युवक, महिला व युवती अध्यक्षपदावर नव्याने नियुक्तया करण्याचे सूतोवाच या वेळी व्यक्त करण्यात आले.
चाबुकस्वार म्हणाले,‘‘आपल्यावरील अकार्यक्षमतेचा ठपका चुकीचा आहे. सर्वाधिक कार्यक्रम आपण घेतले. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची एक लाख पुस्तके वाटली. रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तरीही अन्य पक्षातून आलेल्या कांबळेंची नियुक्ती करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर बौध्द समाजाची नाराजी पक्षाने ओढावून घेतली आहे. विलास लांडेंनी शिफारस केली व आझम पानसरेंनी कार्यकारिणीत संधी दिली होती. आपली उचलबांगडी करून त्यांनाच शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. अजितदादांची दिशाभूल झाली असल्याने त्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगणार व शरद पवार यांच्याकडेही गाऱ्हाणे मांडणार असल्याचे चाबुकस्वार यांनी सांगितले.
मागासवर्गीय सेलच्या अध्यक्षपदावरून पिंपरी राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुनील चाबुकस्वार यांची उचलबांगडी करून ज्ञानेश्वर कांबळे यांची वर्णी लावण्यात आली.
First published on: 27-04-2013 at 01:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leapfrog politics of pimpri ncp regarding obc cell chief