पुणे : एका ७० वर्षीय मधुमेहग्रस्त रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या तपासणीत धमनीमध्ये कॅल्शियमचा जाड थर निर्माण झाला होता. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी स्टेंट टाकणे अवघड बनले होते. अखेर डॉक्टरांनी रुग्णावर लेझरद्वारे स्टेंटविरहित अँजिओप्लास्टी प्रक्रिया यशस्वीपणे करून धमनीतील अडथळा दूर करण्यात आला.

मुंबईनंतर पुण्यात प्रथमच ही प्रक्रिया करण्यात आली असून, ती डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाली आहे. रुग्णालयाच्या हृदयविकार विभागाचे संचालक डॉ. अभिजित पळशीकर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया करण्यात आली. लेझरच्या मदतीने करण्यात आलेल्या अँजिओप्लास्टीमुळे रुग्णाची तब्येत लवकर सुधारली. त्याला एका दिवसात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. लगेचच आपली दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे सुरू करता आली.

याबाबत डॉ. अभिजित पळशीकर म्हणाले की, रुग्णाला या प्रक्रियेच्या तीन दिवस अगोदर हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्याच्यावर औषधांच्या मदतीने उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या धमनीमध्ये कॅल्शियमचा जाड थर जमा झाल्याने स्टेंट टाकण्याची प्रचलित प्रक्रिया पार पाडणे कठीण होते. याचबरोबर हा रुग्णही स्टेंट टाकून घेण्यास तयार नव्हता. लेझरच्या साहाय्याने करण्यात येण्यारी अँजिओप्लास्टी करण्याचा व त्याला औषधवेष्टित फुग्याची जोड देण्याचा पर्याय आम्ही निवडला. यामुळे कायमस्वरूपी धातूचा स्टेंट बसविण्याची गरज न भासता धमनी मोकळी करण्यात यश आले.

याबाबत सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्याधिकारी आणि वैद्यकीय संचालक डॉ. सुनील राव म्हणाले की, ही प्रक्रिया कमीतकमी छेद देऊन केले जाते आणि पारंपरिक स्टेट बसविण्याच्या पद्धतींना एक अधिक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय आहे. पुण्यात पार पडलेली अशा प्रकारची पहिलीच प्रक्रिया यशस्वी झाली आहे. यामुळे हृदयविकाराच्या उपचारांच्या क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

अशी होते प्रक्रिया…

लेझरद्वारे केल्या जाणाऱ्या अँजिओप्लास्टी प्रक्रियेमध्ये एक्सिमर लेझर हे धमनीच्या आत जमलेले कॅल्शियम आणि कोलेस्ट्रॉलचे थर प्रभावीपणे दूर करणारे प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात येते. यानंतर औषधवेष्टित फुग्याचा वापर करण्यात येतो. हा पारंपरिक स्टेंटसाठी एक अनोखा पर्याय आहे. कायमस्वरूपी स्टेंट बसविण्याऐवजी हा फुगा औषधाला धमनीपर्यंत पोहोचवतो आणि त्यानंतर तो काढून घेतला जातो. ही प्रक्रिया स्टेंट बसविणे शक्य नसलेले रुग्ण आणि तरुणांसाठी लाभदायी ठरते.

Story img Loader