‘आर. के. लक्ष्मण ‘थरो जंटलमन’ होते, आणि त्यांची व्यंगचित्रेही त्यांच्यासारखीच असत. ते सौजन्यशीलपणे, ज्याच्यावर व्यंगचित्र चितारले त्याला राग येऊ नये अशा प्रकारे थट्टामस्करी करत. त्यांच्या बोटाला नव्हे, ब्रशला धरुनच मी व्यंगचित्रांच्या प्रांतात आलो,’ अशा भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केल्या.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांच्या ‘कसं बोललात’ या सात भागांच्या पुस्तिका संचाचे व इ- बुकचे शुक्रवारी प्रकाशन करण्यात आले. लक्ष्मण यांच्याच ‘यू सेड इट’ या व्यंगचित्रमालिकेचाच हा मराठी अनुवाद असून मेहता पब्लिकेशन व ‘डेलीहंट’ या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी तेंडुलकर बोलत होते.लक्ष्मण यांच्या पत्नी कमला लक्ष्मण, अनुवादक अनिवाश भोमे, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलगुरू शां. ब. मुजुमदार, मेहता प्रकाशनाचे सुनील मेहता या वेळी उपस्थित होते. तेंडुलकर म्हणाले, ‘ ‘शंकर्स वीकली’चे शंकर पिल्ले आणि लक्ष्मण यांच्यात फरक होता. पिल्ले हे व्यंगचित्रकार नसते तर ते ‘माईक टायसन’ झाले असते! त्यांच्या राजकीय कोपरखळ्या जबरदस्त असत.लक्ष्मण ‘थरो जंटलमन’ होते, आणि त्यांची व्यंगचित्रेही त्यांच्यासारखीच असत. ज्याच्यावर व्यंगचित्र चितारले त्याला राग येऊ नये अशी थट्टामस्करी ते करत. धकाधकीच्या आयुष्यात सामान्य माणसाला जे बोलावेसे वाटते ते तो बोलत नाही, त्याचा रोज कोंडमारा होतो. या कोंडमाऱ्याला वाट करुन देण्यासाठी आपण व्यंगचित्रे काढतो, असे लक्ष्मण म्हणत. १९५० च्या आधीपासून मी लक्ष्मणांची व्यंगचित्रे पाहतो आहे. त्यांच्या ब्रशला धरुनच मी व्यंगचित्रांच्या प्रांतात आलो. व्यंगचित्र म्हणजे केवळ नाक-डोळे वेडेवाकडे काढणे नव्हे. माणसाच्या चेहऱ्याआडचा माणूस शोधून त्याचे चित्रण करणे म्हणजे व्यंगचित्र. कदाचित म्हणूनच राजकारण्यांना व्यंगचित्रकार अजिबात आवडत नाहीत!’ ‘आज लक्ष्मण असते तर त्यांना या पुस्तिकांबद्दल आनंद वाटला असता, ते नसले तरी त्यांची प्रतिभा जिवंत आहे,’ अशा भावना कमला लक्ष्मण यांनी व्यक्त केल्या. मुजुमदार म्हणाले,‘काही व्यक्ती अमर होतात, पण ‘कॉमन मॅन’ हे एक व्यंगचित्र अमर होण्याचे पहिलेच उदाहरण असावे. लक्ष्मणांच्या सर्व व्यंगचित्रांत कॉमन मॅन असेच, पण काही वेळा ते गंमत करत आणि व्यंगचित्रात कॉमन मॅन काढायचे नाहीत. त्या दिवशी त्यांच्याकडे त्याबद्दल विचारणा करणारे शेकडो दूरध्वनी येत.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा