माण परिसरातील जमिनींवर ‘एमआयडीसी’ने मारलेले शिक्के काढून घेण्यासाठी राज्य शासनाला सांगेल, पण त्यानंतर जमिनी बिल्डरला विकणार असाल, तर माझ्याकडे येऊ नका. शेती व्यवसाय सुरू ठेवण्याबरोबरच एकत्र येऊन मगरपट्टा, नांदेड सीटीसारखा प्रकल्प उभा करण्याची तयारी असेल, तर मी तुमच्या पाठीशी राहील, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी जाहीर केले.
माण ग्रामपंचायतीचे अत्याधुनिक कार्यालय, ई-प्रकल्प त्याचप्रमाणे इन्फोसिस फाऊंडेशन व कर्मचाऱ्यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, माणच्या सरपंच पार्वतीबाई भरणे, ‘इन्फोसिस’चे प्रवीण कुलकर्णी, ‘परसिस्टंट’चे मृत्युंजय सिंह आदी त्या वेळी उपस्थित होते. िहजवडी आयटी पार्कच्या चौथ्या टप्प्यासाठी ‘एमआयडीसी’ने माण व परिसरातील जमिनींचे नियोजन केले आहे. या प्रकरणी काही वर्षांपूर्वी माण परिसरात मोठे आंदोलनही झाले होते. त्यानंतर शरद पवार प्रथमच माणमध्ये उपस्थित राहिल्याने जमिनीवरील ‘एमआयडीसी’चे शिक्के काढून घेण्याची जोरदार मागणी मांडण्यात आली. त्यावर पवार यांनी भाष्य केले.
हिंजवडी व परिसराची मोठी प्रगती झाल्याचे सांगत पवार म्हणाले की, या प्रगतीत गावचा मूळ नागरिक उद्ध्वस्त होणार असेल, तर प्रगतीचा गावाला उपयोग नाही. अनेकांच्या जमिनी एमआयडीसीने घेतल्या. त्यातून इमले उभे राहिले. जगभरातील कंपन्या आल्या. शेवटच्या टप्प्यासाठी ‘एमआयडी’सीने जमिनीवर शिक्के मारल्याने शेतीसाठीही अडचण निर्माण झाली. मात्र, यातून मार्ग काढणे शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयही तुमच्या बरोबर आहे. माझ्याकडून त्यासाठी मदत केली जाईल. शिक्के काढून घेण्यासाठी राज्य शासनाशी बोलेल, पण जमिनी तुम्हीच ठेवा. त्यावर नियोजनबद्ध प्रकल्प एकत्र येऊन उभारा. शेती व्यवसाय सुरू ठेवून नव्या पिढीलाही उद्योग देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तुम्ही एकत्र येणार असाल, तर असा प्रकल्प उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे. मात्र, येथे गुंठेवारी येऊ नये. त्याचप्रमाणे गुंडगिरीच्या रस्त्यावरही जाऊ नका. एकत्र येऊन मार्ग काढण्यासाठी तयार असाल, तर गावातील प्रमुख लोकांनी माझी भेट घ्यावी.
सुळे म्हणाल्या की, जमिनीवरील शिक्के काढून घेण्यासाठी नारायण राणे व पालकमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे. जेजुरी भागात असाच प्रश्न निर्माण झाला होता. तेथे अतिरिक्त जागेचे शिक्के काढले. तोच न्याय माण भागालाही मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा