शिरुर : श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुर यांचा वतीने शिवजयंती निमित्त दिनांक १५ फेबृवारी ते १९ फेबृवारी २०२५ रोजी शिवजयंती निमित्त स्वर्गिय धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी सांगितले की व्याख्यानमालेचे यंदाचे २८ वे वर्ष आहे. १५ फेबृवारी ते १९ फेबृवारी २०२५ रोजी ही व्याख्याने सायंकाळी दररोज पावणेसात वाजता साई गार्डन मंगल कार्यालय कॉलेज रोड येथे होणार आहेत. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १५ फेबृवारीस माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी ‘न्यायव्यवस्था सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर गुंफणार आहेत. १६ फेबृवारीला इतिहास संशोधक व ज्येष्ठ पत्रकार अशोककुमात पांडेय हे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतिचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम’ या विषयावर बोलणार आहेत.
१७ फेबृवारी रोजी माजी मुख्य सचिव महेश झगडे हे ‘लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही : संविधानिक जबाबदाऱ्या आणि वास्तव’ या विषयावर बोलणार आहेत .१८ फेबृवारीस इतिहास संशोधक व व्यवस्थापन मार्गदर्शक डॉ. अजित आपटे हे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र’ या विषयावर बोलणार आहेत. १९ फेबृवारीस प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एकूण लेखन’ या विषयावर बोलणार आहेत.
शिवजयंतीला बुधवार दिनांक १९ फेबृवारीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे . यावेळी पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, उद्योजक व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, मुख्याधिकारी प्रितम पाटील, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे आदी उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने नागरिकांनी व्याख्यानमालेस उपस्थित रहावे असे आवाहन धनक यांनी केले आहे.