‘लेक वाचवा’ च्या पुढे एक पाऊल टाकून राज्याच्या शिक्षण विभागाकडून आता ‘लेक शिकवा’ अभियान राबवण्यात येणार असून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३ जानेवारीपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे.
राज्यभरात सर्व ठिकाणी विशेषत: राज्यातील ग्रामीण भागामध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नायगावपासून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २६ जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये मुली शिक्षणाकडे वळाव्यात, मुलींना शिकवण्याची मानसिकता वाढीस लागावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळेत सातत्याने अनुपस्थित असलेल्या मुलींच्या घरी शालेय समितीच्या सदस्य भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे शाळेत न जाणाऱ्या मुलींना शाळेत पाठवावे यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रम करण्यात येणार आहेत.
या कालावधीमध्ये गावातील शिक्षिकांचा, महिला कार्यकर्त्यांचा, महिला पालकांचा, एकच मुलगी असलेल्या पालकांचा, विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार शाळांमध्ये करण्यात येणार आहे. आदर्श माता पुरस्कारही देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या अभियानामध्ये मुलींची आरोग्य तपासणी, ज्युडो-कराटेंचे प्रात्यक्षिक, संगणक साक्षरता वर्ग, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम, वक्तृत्व, निबंध, मैदानी खेळांच्या स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
सावित्रीबाई फुले दत्तक योजनेचा
निधी वाढवण्यासाठी प्रयत्न
लोकसहभागातून जमा झालेल्या निधीमधून मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबवण्यात येते. जमा झालेल्या निधीवरील व्याजातून गरजू विद्यार्थिनींना दरवर्षी ३०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. हा निधी लोकसहभागातून वाढावा आणि त्या अनुषंगाने शिष्यवृत्तीची रक्कम वाढवता यावी, यासाठी या अभियानांतर्गत प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader