जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील धर्मनाथ मंदिराजवळ अंदाजे तीन वर्ष वयाचा बिबटय़ा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत स्थानिक रहिवाशांनी सांगतिले की, साकोरी गावचे रहिवासी बाबू गायकवाड गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेताकडे गवत काढायला गेले होते. त्या वेळी त्यांना झाडाखाली एक बिबटय़ा पडलेला दिसला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थ त्या ठिकाणी जमले. त्यांना वाटले की बिबटय़ा झाडाखाली झोपला आहे. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. मोठय़ाने आवाज केला. तरीही त्याची हालचाल दिसली नाही. मात्र, त्यानंतर ते दबकत दबकत बिबटय़ाजवळ पोहोचले. तरीही त्याने हालचाल केली नाही. मग त्यांना समजले की तो मृत अवस्थेत आहे. त्यांनी लगेचच ही माहिती वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना दिली. वनकर्मचारी आनंदा गुंजाळ, बजरंग केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हा नर बिबटय़ा होता. त्याचे अंदाजे वय तीन वर्ष इतके असल्याचे वनकर्मचारी आनंदा गुंजाळ यांनी सांगितले. त्या बिबटय़ाला बेल्हा येथील कार्यालयात आणून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
जुन्नर तालुक्यात तरुण बिबटय़ाचा मृतहेद सापडला
जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील धर्मनाथ मंदिराजवळ अंदाजे तीन वर्ष वयाचा बिबटय़ा मृत अवस्थेत आढळून आला.
First published on: 07-08-2015 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard found dead in junnar