प्रकाश खाडे, जेजुरी

पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळ असलेल्या नाझरे परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचे वास्तव्य असल्याची चर्चा होती, याबाबत वनविभागालाही शेतकऱ्यांनी कळवले होते, मात्र बिबट्या असल्याबाबत वनविभागाने ठोस माहिती दिली नव्हती. मंगळवारी (दि. 21) नाझरे हद्दीतील चिकणे वस्तीजवळ सागर नामदेव चिकणे यांच्या शेतामध्ये मेंढपाळ मारुती महानवर यांनी पाल टाकले होते. त्यांच्या 200 शेळ्या मेंढ्या शेतात होत्या. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक दोन बिबट्यांनी मेंढ्यांवर हल्ला केला. तेव्हा मेंढपाळ व त्याच्या समवेत असणाऱ्या दोघांनी घाबरून जोरात आरडाओरडा केल्याने दोन्ही बिबट्या उसाच्या शेतात पळून गेले.जाताना त्यांनी दोन मेंढ्या ओढून नेल्या. बिबट्यांच्या हल्ल्यात दोन शेळ्या व दोन मेंढ्या मृत्युमुखी पडल्या.

हा प्रकार आजूबाजूला समजल्यावर तेथे शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले.सहा मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सागर चिकणे यांनी तातडीने या हल्ल्याची माहिती वनखात्याला कळवली. बुधवारी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन पंचनामा केला. त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे उमटल्याचे दिसून आले, हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. हल्ला केलेली जागा जेजुरी पासून अगदी जवळ असून नाझरे धरणाच्या कडेला आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक आंघोळीसाठी येतात. त्यामुळे जेजुरी व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.शहरी भागाच्या जवळ बिबट्या प्रथमच आल्याने सर्वत्र हिच चर्चा सुरु आहे

कडेपठारच्या डोंगरातही बिबट्याचा वावर

जेजुरीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून कडेपठारच्या डोंगरात बिबट्या पाहिल्याची चर्चा अनेक जण करत होते.याबाबत अनेकांनी वनविभागाकडे माहिती दिली होती. रात्रीच्या वेळी कडेपठारच्या डोंगरात जाण्यास लोक घाबरत होते. मात्र बिबट्याने कोणालाही त्रास दिला नव्हता. कोणत्याही प्राण्यावर हल्ला केलेला नव्हता. अनेकजण बिबट्या आला ही अफवा असल्याचे सांगत होते.मात्र आता या बिबट्यांचा वावर कडेपठारच्या डोंगरात निश्चित असावा या चर्चेला पुष्टी मिळत आहे.

वनविभागाकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन

नाझरे परिसरातील शेतावर जाऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला व येथे बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले.या परिसरात लोकांची वर्दळ भरपूर असते ऊस लागवडीचे क्षेत्र बऱ्यापैकी असल्याने बिबट्याला उसात लपण्यास जागा आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी विशेष काळजी घ्यावी. शक्यतो रात्रीच्या वेळी शेतात फिरणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये,घराच्या परिसरात फटाके जोरात वाजवावेत , बाहेर जावयाचे झाल्यास हातामध्ये बॅटरी,घुंगराची काठी घ्यावी, मोबाईलचा मोठा आवाज ठेवावा,समूहाने मोठ्याने आवाज करत चालावे,पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यामध्ये ठेवावे, घराच्या परिसरात दिवे भरपूर लावावेत आदि सूचना वन खात्याने केल्या आहेत.या परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने वन खात्याने विशेष लक्ष ठेवले असून पेट्रोलिंग सुरू केल्याची माहिती सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी दिली.