लोकसत्ता वार्ताहर
इंदापूर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव नजीक काळेवाडी येथे सोलापूर पुणे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याचे वय तीन ते चार वर्षांचे असून वजन पन्नास किलोहून अधिक असावे, असा अंदाज आहे. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञात जड वाहनाची बिबट्याला धडक बसली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेले अनेक दिवस या बिबट्याचे अस्तित्व कोणाच्याही निदर्शनास आले नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना प्रचंड धक्का बसला आहे.
आणखी वाचा- पुणे: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता
या महामार्गालगतच दक्षिण बाजूला वन विभागाचे मोठे क्षेत्र असून मोठी झाडी आणि दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. तर, उत्तरेला उजनी जलाशयाचा भाग आहे. याच भागात शेती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने शेतकऱ्यांचा वावर या परिसरामध्ये रात्री अपरात्री कायम असतो.
अशा रहदारीच्या ठिकाणी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या अपघाताचे वृत्त समजतात वन खाते, व संबंधितांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रात्र असूनही घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती.