पुणे : बिबट्याची कातडी परदेशात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास सीमाशुल्क विभागाने (कस्टम) साताऱ्यातून अटक केली. त्याच्या घरातून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात अटक केलेला आरोपी दूध डेअरी व्यावसायिक आहे. साताऱ्यातील जंगलात बिबट्याची शिकार करुन परदेशात विक्री केली जात असल्याची माहिती कस्टमच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर कस्टमच्या पथकाने साताऱ्यात कारवाई करुन दूग्ध व्यावसायिकाला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले.
हेही वाचा : सरकार नामर्द, आंदोलन करणार; बच्चू कडू यांचा ‘प्रहार’
आरोपीचा एक साथीदार दुबईत पसार झाल्याची माहिती कस्टमच्या पथकाला मिळाली आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबट्याच्या कातडीची परदेशात विक्री करण्यात आणखी कोण सामील आहेत का? यादृष्टीने तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.