पुणे : बिबट्यांकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी वनविभागाच्या सौर कुंपण योजनेचा जुन्नर परिसरातील बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत असून सौर कुंपणामुळे बिबट्या आता घराजवळही येत नाही. बिबट्याचा घरातील शिरकाव रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाची ही क्लुप्ती परिसरातील नागरिकांना लाभदायी ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्नर वनविभागाने बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी विविध संकल्पना राबविल्या आहेत. त्यामध्ये सौर कुंपण योजना ही अत्यंत प्रभावी उपाययोजना ठरली आहे. सौर कुंपणामुळे बिबट्याला हलक्या स्वरूपाचा वीजेचा धक्का लागून गजर वाजतो. वीजेचा सौम्य धक्का लागल्यामुळे आणि त्याचवेळी वाजलेल्या गजरामुळे बिबट्या त्या ठिकाणाहून पळून जातो. सध्या जुन्नर तालुक्यात सहा आणि शिरूर तालुक्यात चार शेतकऱ्यांच्या घराला सौर कुंपण करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना या सौर कुंपणाचा चांगला फायदा होत असून सौर कुंपण केल्यापासून बिबट्या त्या घराकडे अद्याप एकदाही फिरकला नाही.

हेही वाचा – मुंबईच्या कोअ‍ॅडजुटेर बिशपपदी जॉन रॉड्रिग्स यांची नियुक्ती

घराभोवतीचा साधारण अर्धा एकर परिसर या सौर कुंपणाद्वारे बंदिस्त करता येणार आहे. एका सौर कुंपणासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. यापैकी शासन ७५ टक्के खर्च करणार असून २५ टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्याने करायचा आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ ही नावीन्यपूर्ण योजना उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत लाभार्थी हिस्स्याची प्रत्येकी साडेसात हजार रुपये रक्कम भरलेल्या जुन्नर तालुक्यातील सहा आणि शिरूर तालुक्यातील चार अशा दहा घरमालकांना याचा लाभ देण्यात आला आहे.

बिबट्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे सौर कुंपण अत्यंत प्रभावशाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घराला सौर कुंपण केले आहे त्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. अतिसंवेदनशील भागातील बिबट हल्ल्याचा संभाव्य धोका आणि जीवितहानी टाळण्यासाठी एकांतात असलेल्या जास्तीत जास्त घरमालकांनी हे कुंपण तातडीने करून घेणे आवश्यक आहे. – अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर

हेही वाचा – थंडी गायब झाली…आता पावसाची शक्यता

बिबट्याने घराजवळ येऊन आमच्या पाळीव कुत्र्यांना ठार केले आहे. सौर कुंपण लागल्यापासून बिबट्या पुन्हा आमच्या घराकडे आला नाही. इतर वन्यजीवांपासून देखील या सौर कुंपणामुळे संरक्षण होत आहे. – सागर मोरे, शेतकरी, शिरोली खुर्द (जुन्नर)

किती जणांना होणार सौर कुंपणाचा लाभ

जुन्नर वनविभागामार्फत जुन्नर तालुक्यातील ४००, शिरूर तालुक्यातील २००, आंबेगाव तालुक्यातील ६० शेतकऱ्यांची या सौर कुंपण योजनेसाठी निवड करण्यात आली असून पुढील काळात या शेतकऱ्यांना सौर कुंपण दिले जाणार आहे. या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १५० लाख रुपये एवढ्या रक्कमेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये २२ हजार ५०० रुपये प्रति लाभार्थी यानुसार एकूण ६६० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard solar fence idea junnar forest department pune print vvk 10 news ssb