दुष्काळी तालुका असलेल्या शिरूरची ओळख बदलत असून, आता या तालुक्याचा पूर्व भाग व बेट भागात गेल्या काही वर्षांपासून बिबटय़ाचा वावर वाढला आहे. विशेषत: ऊसशेती मोठय़ा प्रमाणावर वाढलेल्या भागात बिबटय़ाचे वास्तव्य आढळून आले असून त्याचा वावरही वाढला आहे.
उसाचे वाढते क्षेत्र बिबटय़ाचा वास्तव्याकरिता सोईचे ठरत आहे. पूर्व भागात भीमा नदी, घोडनदी, घोडधरणाचा फुगवटा यामुळे पाण्याची उपलब्धता व पाणवठे मोठय़ा प्रमाणावर आहेत. साहजिकच बिबटय़ाच्या वास्तव्यासाठी या अनुकूल बाबी आहेत. या सर्व बाबींमुळे मागील काही वर्षापासून बिबटय़ाचा वावर वाढला आहे. निर्वी येथील बक्षाच्या शोदात आलेला बिबटय़ा एका शेतक ऱ्याच्या कोंबडय़ाच्या खुराडय़ात अडकला होता. शिरसगाव फाटा येथील शेतकरी गद्रे यांच्या शेतातच काही दिवसापूर्वी बिबटय़ाच्या मादीने तीन बछडय़ांना जन्म दिला. अशा वाढत्या घटनांमुळे या परिसरात बिबटय़ाचे दर्शन नित्याचे बनले आहे. परिसरातील कुत्री, कोल्हे या बिबटय़ांनी फस्त केली आहेत. अजून तरी माणसांवर हल्ले झाले नाहीत. मात्र, नांगरगाव परिसरात दिवसा ऊसतोड मजूर व शेतकरी रात्रीच्या वेळेस एकटे-दुकटे बाहेर फिरण्यासही धजावत नव्हते. याबाबत नांगरगावचे रहिवासी पोपट शेलार यांनी सांगितले की, बिबटय़ाचा वावराने या परिसरात शेतकरी भीतीच्या छायेखाली आहे. वनखात्याकडे तक्रार करूनही बिबटय़ांना पकडण्याकरिता पिंजरा लावणे अथवा इतर उपाययोजना केले जात नाहीत.
या परिसरात वाढलेल्या ऊसशेतीचा व बिबटय़ाचा वावर वाढण्याशी काही संबंध आहे का, याचा तातडीने अभ्यास होणे गरजेचे आहे. उसाची वाढती शेती, सहजपणे उपलब्ध होणारे पाणी, भक्ष्य यामुळे जुन्नर भागातून भक्ष्याचा शोधाला निघालेले बिबटे शिरूरच्या पूर्व भागात स्थिरावले असावेत, असे काही निरीक्षण अभ्यासक मांडतात.
शिरूर येथील वनखात्याचे अधिकारी दिलीप बुर्डे यांनी सांगितले, की यापूर्वी तालुक्यातून दोन बिबटय़ांना पकडण्यात आले असून न्हावरा, मांडवगण फराटा परिसरातील गावात वनखात्याचे गस्त पथक कार्यरत असून बिबटय़ाचा वावर असताना काय काळजी घ्यावयाची याची माहिती ग्रामस्थांना देत आहे. बिबटय़ाचा या परिसरातील वाढता वावर हा निगर्सात होत असणारे बदलाचे संकेत स्पष्टपणे दर्शवित आहे.
पश्चिम घाटातील मानवी हस्तक्षेपाशी संबंध!
बारामती येथील पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले, ‘‘पर्यावरण व निसर्ग समतोलाच्या दृष्टीने पश्चिम घाटाचे महत्त्व मोठे आहे. परंतु या पश्चिम घाटातील परिसरात विकासाच्या नावाखाली मानवी हस्तक्षेप वाढत आहे. यातून निसर्गातील जैवविविधता, संतुलन, वन्यजीवन वनस्पती यांच्यावर परिणाम होत आहे. प्राण्यांचे होत असणारे स्थलांतर हा त्याचाच एक भाग आहे. पश्चिम घाटातील जंगलांचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. जंगलाचा विनाश न करता विकास केला पाहिजे. नैसर्गिक अधिवासाची जपणूक करणे ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. नैसर्गिक अधिवासाची जपवणूक न करता विकास उभा केल्यास उद्या मानवाचा अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो.’’