पुण्यातील सदाशिव पेठेत कोयता हल्ल्यात मुलीचा जीव वाचवणारा लेशपाल जवळगे आणि त्याचे काही साथीदार सध्या बरेच चर्चेत आहेत. राज ठाकरेंपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत सर्वांनी त्यांचं कौतुक केलंय. एवढंंच नव्हे तर शब्द दिल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाडांनी त्यांना पारितोषिकही दिलं. यासाठी जितेंद्र आव्हाडांनी या तिघांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान या तिघांनीही जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हक्काची आणि प्रेमळ मागणी केली आहे.
लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणीवर होणारा कोयता हल्ला हाणून पाडला. यामध्ये ते तिघेही किरकोळ जखमी झाले. परंतु, तरीही आपल्या जीवाची बाजी लावून तरुणीला नराधमाच्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांचं जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून कौतुक केलं होतं. यावेळी त्यांनी ५१ हजार रुपयांचे बक्षिसही जाहीर केले होते. त्यानुसार, जितेंद्र आव्हाड यांनी काल २९ जून रोजी या तिघांचीही भेट घेतली. या वेळी त्यांनी या तिघांचं तोंड भरून कौतुक केलं. लेशपाल, हर्षद आणि दिनेश यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मागणी केली आहे.
हेही वाचा >> “मुलीची जात विचारून तिची ओळख…”, लेशपाल आणि हर्षदची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट, म्हणाले…
आम्हाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायचं आहे, अशी मागणी त्यांनी केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते म्हणाले की, “विचारांनी प्रगल्भ आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत. अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल, यात शंका नाही. मी शब्द दिला होता त्याप्रमाणे, तिघांना पारितोषिक दिलं आहे. या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे..! आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार आहे.”
दरम्यान, लेशपालने पीडितेचा जीव वाचवल्यानंतर त्याला इन्स्टाग्रामवर खूप लोकांनी मेसेज केले. त्या मुलीची आणि मुलाची जात कोणती असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने उद्विग्न होऊन इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. “त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला”, अशी इन्स्टाग्राम स्टोरी लेशपालने ठेवली होती.