लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : दरवर्षी हिवाळ्यात प्रामुख्याने डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारताला पाच ते सात थंडीच्या लाटांचा सामना करावा लागतो. मात्र, यंदा डिसेंबरअखेर थंडीची लाट आली नाही. जानेवारी आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आहे.

हवामान विभागाने ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या दीर्घकालीन अंदाजात यंदाच्या हिवाळ्यात थंडीच्या लाटांची शक्यता कमी असल्याचे म्हटले होते. एल-निनोच्या परिणामामुळे हिवाळ्यात थंडीही सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार डिसेंबरअखेर देशात थंडी सरासरीपेक्षा कमी राहिली आहे. राज्यातही तीच स्थिती आहे. डिसेंबरअखेर थंडीची लाट आली नाही. पुढील दीड महिन्यांत लाटेची शक्यता कमीच आहे. पण, आलीच तर एक किंवा दोन लाटा येतील, त्यापेक्षा जास्त लाटांचा सामना करावा लागणार नाही, असेही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-अबब! रिक्षाचालकाच्या पायातून काढली तब्बल २५ सेंटीमीटरची गाठ

एल-निनोमुळे यंदा एकूणच दक्षिण आशियात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. हिवाळ्यात थंडीही कमीच राहिली आहे. साधारण डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस उत्तर भारतात दाट धुके पडते. यंदा डिसेंबरच्या अखेरीस उत्तरेत दाट धुके पडले आहे. एल-निनोमुळे उत्तर ध्रुवानेही आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा अनुभवला आहे. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातही अपेक्षित थंडी पडलेली नाही. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहात फारसा जोम नाही. त्यामुळे सैबेरियापासून खाली येणारी थंडीच्या लाटा हिमालयीन पर्वतरांगा ओलांडून भारतापर्यंत आल्याच नाहीत. उर्वरीत हिवाळ्यातही म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत थंडीच्या फारशा लाटा येण्याची शक्यता नाही.

एल-निनोमुळे उत्तर ध्रुवासह आर्टिक प्रदेश, सैबेरिया सारख्या अति थंड प्रदेशातील किमान तापमान अपेक्षित प्रमाणात खाली गेले नाही. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिण आशियाकडे वाहणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण आहे. उत्तर भारताला हिवाळ्यात दरवर्षी पाच ते सात थंडीच्या लाटांचा सामना करावा लागतो. पुढील दीड महिन्यात थंडीच्या लाटा येण्याची शक्यता कमीच आहे. आल्याच तर एक किवा दोन थंडीच्या लाटांचा सामना करावा लागेल, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Less chance of cold wave between january and february 15th pune print news dbj 20 mrj
Show comments