लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून, कांदा, शेवगा, घेवडा, मटारच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चुकाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (५ मे) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून प्रत्येकी एक हजार खोकी तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, पावटा २ टेम्पो, तसेच बेळगावहून २ टेम्पो भुईमुग शेंग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ४ ट्रक मटार, मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
आणखी वाचा-केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; पैसे परत मागितल्याने आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी
पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ८० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ३० ते ३५ ट्रक बटाटा अशी आवक झाली.
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चुकाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ६० हजार जुडी अशी आवक झाली. किरकोळ बाजारात एक जुडी मेथी, कोथिंबिरीचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत आहेत. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – १२०० ते २००० रुपये, मेथी – १२०० ते १५०० रुपये, शेपू – ८०० ते १२०० रुपये, कांदापात – ८०० ते १५०० रुपये, चाकवत – ४०० ते ७०० रुपये, करडई – ३०० ते ७०० रुपये, पुदिना – ३०० ते ६०० रुपये, अंबाडी – ४०० ते ७०० रुपये, मुळा – ८०० ते १२०० रुपये, राजगिरा – ४०० ते ६०० रुपये, चुका – ५०० ते १००० रुपये, चवळई – ४०० ते ७०० रुपये, पालक – ८०० ते १५०० रुपये