पावलस मुगुटमल
पुणे : देशात यंदा २९ मे रोजी मोसमी पावसाने केरळमधून भारतात प्रवेश केला आणि २ जुलैला त्याने राजस्थान पार करून देश व्यापला. मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधूनच सुरू होत असतो. त्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर असते. यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारत आणि दक्षिणेकडील विभागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक पावसाचा विभाग म्हणून ओळख असलेल्या ईशान्येकडील राज्यांत पावसाचे प्रमाण कमी दिसून येते.
यंदा देशात नियोजित तारखेच्या आधी म्हणजे २९ मे रोजी मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन झाले होते. जूनमध्ये संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, जुलैमध्ये बहुतांश भागांनी पावसाची सरासरी पूर्ण केली. ऑगस्टमध्ये मात्र देशातील बहुतांश भाग पावसात मागे पडला असल्याचे दिसून येते. ईशान्येकडील राज्ये आणि उत्तरेकडील बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे. मोसमी पावसाचा प्रवेश झाल्यापासून तो देशातून परत जाण्यापर्यंतचा सर्वाधिक कालावधीसाठी केरळमध्ये पाऊस असतो. मात्र, ऑगस्ट महिन्यात या राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सध्या केरळमध्ये पाऊस १७ टक्क्यांनी उणा आहे. विशेष म्हणजे शेजारील तमिळनाडू राज्यात मात्र सरासरीच्या तुलनेत देशातील ७० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
दिल्लीतही पावसाने हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. दिल्लीत २९ टक्के पाऊस उणा आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस बिहार, उत्तर प्रदेश, मणिपूर आदी राज्यांमध्ये झाला आहे. या राज्यांत तो ४० टक्क्यांहून अधिक उणा असल्याचे दिसून येते. ईशान्येकडील जवळपास सर्वच विभागांमध्ये पाऊस सरासरी गाठू शकलेला नाही. उत्तरेकडील बहुतांश राज्यांतही हीच स्थिती आहे. मात्र, ऑगस्टच्या शेवटच्या दिवसांत या भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
केरळमध्ये सर्वात कमी..
देशातील मोसमी पावसाचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या केरळ राज्यामध्येच यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. केरळचा समावेश असलेल्या दक्षिण विभागात मात्र पाऊस सरासरीत पुढे आहे. संपूर्ण भारतामध्ये सध्या ९ टक्के पाऊस अधिक असला, तरी राजधानी दिल्लीसह एकूण १८ राज्यांमध्ये पाऊस सरासरीच्या तुलनेत उणा आहे.
सर्वात कमी पावसाची राज्ये – उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, केरळ, त्रिपुरा, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड
सर्वाधिक पावसाची राज्ये – तमिळनाडू, तेलंगना, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड
भीती काय?
गेल्यावर्षी सर्वसाधारण तारेखेपेक्षा १९ दिवस उशिरा म्हणजे ६ ऑक्टोबरला राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाला होता. महाराष्ट्रातून १४, तर देशातून १५ ऑक्टोबरला मोसमी पाऊस परतला. यंदाच्या अंदाजानुसार परतीचा प्रवास लवकर सुरू झाल्यास पावसाचा हंगामातील कालावधी कमी होऊ शकतो.