‘धप्पा’, ‘आम्ही दोघी’ या दोनच चित्रपटांची निवड

पुणे : गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रतिष्ठेच्या इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत निवडीमध्ये मराठी चित्रपटाचे चित्र यंदा उलट झाले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच तीनपेक्षा कमी मराठी चित्रपट आणि तीनपेक्षा जास्त लघुपटांची निवड झाली आहे. या वर्षी दोन चित्रपट आणि नऊ लघुपटांची महोत्सवासाठी निवड झाली.

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याच महिन्यात होणार आहे. महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांची निवड काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. मात्र, या निवडीनंतर वेगळेच चित्र स्पष्ट झाले आहे. या वर्षी धप्पा आणि आम्ही दोघी हे चित्रपट निवडले गेले. तर खरवस, हॅप्पी बर्थ डे, ना बोले हराम, सायलेंट स्क्रीम, येस आय अ‍ॅम, माऊली, पॅम्प्लेट, आईशप्पथ आणि भर दुपारी या लघुपटांची निवड झाली.

त्यातील ‘खरवस’ या लघुपटाला नॉन-फीचर विभागाच्या उद्घाटनाच्या लघुपटाचा मान मिळाला.

या विभागासाठी निवडलेल्या एकूण २१ लघुपटांपैकी ९ लघुपट मराठी आहेत. यंदा निवड झालेल्या चित्रपट, लघुपटांच्या अगदी उलट चित्र गेल्या वर्षी होते. गेल्या वर्षी सर्वाधिक नऊ चित्रपट आणि दोन लघुपटांची महोत्सवासाठी निवड झाली होती.

‘पद्मावत’च्या निवडीवर टीका

मुख्य धारेतील चित्रपट या शीर्षकाअंतर्गत या वर्षी चार चित्रपटांची निवड करण्यात आली. त्यात राझी, टायगर जिंदा है, पद्मावत या तीन चित्रपटाची निवड झाली. मात्र, टायगर झिंदा है आणि पद्मावत या दोन चित्रपटांच्या निवडीवरून समाजमाध्यमांत टीका करण्यात आली. वेगळा आशय-विषय मांडणारे चित्रपट मिळाले नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

वर्षनिहाय आकडेवारी

वर्ष     चित्रपट  लघुपट

२०१३   ३         २

२०१४   ७         ३

२०१५   ४        २

२०१६   ४        ३

२०१७   ९        २

२०१८   २        ९

इंडियन पॅनोरमामध्ये निवडीमागे गुणवत्ता हा निकष असतो. महोत्सवात काही कोटा पद्धत नाही आणि कमी-जास्त प्रमाणात निवड होणे हे होतच असते. गेल्या वर्षी सर्वाधिक मराठी चित्रपटांची निवड झाली होती. गेल्या काही वर्षांत मराठीत उत्तम लघुपट होतात. त्याचा परिणाम यंदाच्या निवडीवर दिसून येतो. तसेच यंदा मराठी चित्रपटांची संख्या कमी झाली म्हणून भाषिक अस्मितेचा किंवा डावलले गेल्याचा मुद्दा आणू नये. 

– संतोष पाठारे, चित्रपट समीक्षक