इस्राइलच्या शिष्टमंडळासमवेत कार्यशाळा; नागरिकांच्या सहभाग वाढवण्याबाबत चर्चा

खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट सिटी’ करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत बैठकांचे सत्र सुरू असतानाच, ‘स्मार्ट सिटी’च्या यशस्वितेसाठी आवश्यक ते धडे इस्राइलकडून घेण्यात आले आहेत. त्यासाठी इस्राइलच्या शिष्टमंडळासमवेत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात या संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, कार्यकारी अभियंता कैलास थोरात, प्रवीण लडकत, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते. इस्राइलच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळात जोहार, डॉ. रावेल, डॉ. राम तसेच समन्वयक वैभव सराफ यांचा समावेश होता.

इस्राइल येथील ‘तेल अविव’ या शहराच्या विकासकामांची माहिती ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून कार्यशाळेत सादर करण्यात आली. ‘स्मार्ट सिटी’ची योजना आम्ही तिकडे कशी यशस्वी केली, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. स्मार्ट सिटी योजनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे, याबाबतचा आराखडा अधिकाऱ्यांना देण्यात आला. पालिका अधिकाऱ्यांनी या योजनेच्या यशस्वितेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या, त्याची सविस्तर माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली. पिंपरी पालिकेचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त झाला आहे. ही योजना शहरात यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील तसेच स्तरातील नागरिकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. नागरिकांकडून सूचनांचा अंतर्भाव करून स्मार्ट सिटी योजना प्रभावीपणे राबवणे शक्य होऊ शकते, त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढवणे अत्यावश्यक आहे, यादृष्टीने कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

Story img Loader