पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झालेल्या ओमप्रकाश बकोरिया यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्या, अशी मागणी करणारे पत्र पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. व्यवस्थापनातील सततच्या बदलांमुळेच पीएमपीएमएल खिळखिळी झाली असून तिला मार्गावर ठेवण्यासाठी स्थिर नेतृत्वाची गरज असल्याचा आग्रह या स्वयंसेवी संस्थांकडून धरण्यात आला आहे.
हेही वाचा- ‘यु-डायस प्लस’मध्ये शाळांची माहिती भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंतची मुदत
‘परिसर’ संस्थेचे रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे आणि सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर यांनी हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. २००७ पासून पीएमपीएमएलला १८ व्यवस्थापकीय संचालक मिळाले. त्यांपैकी नऊ हे पूर्णवेळ होते. तर उर्वरित नऊ अधिकाऱ्यांवर पीएमपीएमएलचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आर. एन. जोशी यांना कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळाली. नयना गुंडे यांना दोन वर्षे पीएमपीएमएलचे काम करण्याची संधी मिळाली. उर्वरित व्यवस्थापकीय संचालक हे एक वर्ष किंवा त्याहून कमी कालावधीसाठी या पदावर कार्यरत राहिले आहेत, याकडे या स्वयंसेवी संस्थांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा- ‘सिलेक्ट वर्ल्ड काँग्रेस’ परिषदेत ‘एफटीआयआय’चे आठ सामंजस्य करार
याबाबत वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे म्हणाल्या,की नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या व्यक्तीला पीएमपीएमएलसारख्या संस्थेच्या कामाचा अंदाज येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठीही वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. सातत्याने या पदावरील व्यक्ती बदलत राहिल्यामुळे बस सेवेमध्ये कोणताही सकारात्मक बदल दिसणे शक्य नाही, असेही देशपांडे म्हणाल्या.
हेही वाचा- पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित
‘परिसर’चे रणजित गाडगीळ म्हणाले, की २०१६ पासून प्रवासी संख्या थोड्याफार फरकाने सारखीच राहिल्याचे पीएमपीएमएलकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या वार्षिक अहवालातून दिसून येते. सर्वाधिक प्रवासी संख्या ऑगस्ट महिन्यात दिसून येते. प्रवासी संख्या वाढवणे, हे मुख्य आव्हान आहे. मात्र, त्यावर काम करण्याऐवजी पीएमपीएलचे नेतृत्व ई-कॅब सारख्या प्रवासी संख्या वाढवण्यास उपयुक्त नसलेल्या निर्णयावर वेळ घालवताना दिसतात. याकडे या पत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले आहे.