खड्ड्यांमुळे शहरातील विविध रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून गंभीर अपघात घडण्याची शक्यता असल्याने तातडीने खड्डे बुजवावेत, असे पत्र वाहतूक पोलिसांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची मोजदाद होत नसल्याने तातडीने खड्डे बुजविण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, असे वाहतूक पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे.

गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहराच्या वेगवेगळ्या भागात मलनिस्सारण वाहिन्यांची कामे सुरू होती. पावसाळा तोंडावर असतानाही रस्ते खोदाईची कामे सुरू होती. त्यानंतर ठेकेदारांनी खोदलेल्या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती केली. खड्ड्यात खडी भरून त्यावर सिमेंटचा थर दिला. मुसळधार पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आलेल्या खड्डयांमधील खडी बाहेर पडली. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून खड्ड्यातून वाट काढावी लागत आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस कमी झाला असून खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे. खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत तसेच उपाययोजना करण्यात याव्यात, असे पत्र वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठविले आहे. पावसाळ्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती वाहतूक शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पावसाळ्यात पाणी साचण्याची ठिकाणे
पावसाळ्यात पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत होते. पाण्यााचा निचरा त्वरित होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत वाहतूक पोलिसांनी पाणी साचण्याच्या ठिकाणांची यादी महापालिका प्रशासनास दिली आहे. हडपसर, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, वारजे, वानवडी, स्वारगेट, सिंहगड रस्ता, विमानतळ, बंडगार्डन, खडकी, शिवाजीनगर, येरवडा, लोणीकंद, दत्तवाडी, रास्ता पेठ, सोमवार पेठ, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, लष्कर भागातील नेहरु मेमोरिअल हाॅल, खाणे मारुती चौक परिसरात पाणी साठण्याच्या घटना घडतात. पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहतुकीचा वेग संथ होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader