पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा आरोप खेडचे प्रांताधिकारी तथा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी करत मतमोजणीपूर्वी डॉ. दिवसे यांची बदली करावी. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक अधिकारी, कर्मचारी पारदर्शकपणे काम करू शकणार नाहीत, अशा आशयाचे पत्र कट्यारे यांनी महाराष्ट्राचे प्रधान सचिव, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना बुधवारी पाठविले.लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना या पत्रामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. दिवसे यांची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. त्यांनी पुण्यामध्ये कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त, तसेच विविध पदांवर पुणे जिल्ह्यातच गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. त्यामुळे त्यांचे पुण्यातील राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असून त्यांचे वर्तन राजकीय नेत्यांना अनुकूल आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना त्यांच्या अधिकारात नसताना डॉ. दिवसे यांनी माझे भूसंपादनाचे अधिकार काढून घेतले आहेत. तसेच माझी यापूर्वी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाची चौकशी सुरू असताना स्वतंत्र चौकशी पथक नेमून २८ मे रोजी कोणतीही कल्पना न देता माझ्या आणि खेड तहसीलदार यांच्या कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली. हे सर्व खेडच्या विद्यमान आमदारांना हाताशी धरून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. खेडचे स्थानिक विद्यमान आमदारांना मी आणि माझे तहसीलदार यांचे काम सुरू ठेवू द्यायचे नाही, म्हणून राजकीय आणि आर्थिक कारणास्तव आमची बदली करायची आहे. त्यामुळे डॉ. दिवसे यांनी अधिकृतपणे काम करण्याऐवजी काही राजकीय व्यक्तींचे मध्यस्थ म्हणून काम करत आहेत, असे गंभीर आरोप कट्यारे यांनी पत्रात केले आहेत.

हेही वाचा >>>मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आमदाराचे नाव घेणे टाळले

कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठविताना केवळ खेडचे विद्यमान आमदार म्हणून उल्लेख केला आहे. विद्यमान आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीतील मार्ग सुरळीत करून देण्यासाठी डॉ. दिवसे प्रयत्न करत आहेत. विद्यमान आमदारांना स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी आणि राजकीय, आर्थिक इच्छा पूर्ण करण्यासाठी माझी बदली करण्याचे प्रयत्न आहेत. त्यानुसार दिवसे आणि आमदार माझ्या विरोधात असंविधानिकपणे पुरावे तयार करत आहेत. मतमोजणी (४ जून ) पार पडल्यानंतर ते माझी बदली देखील करतील, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे : लष्करात भरतीच्या बदल्यात पैशांची मागणी; लेफ्टनंट कर्नलवर सीबीआयकडून गुन्हा

इंदापूरच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांवरही आरोप

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतर्गत २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी हे सतत कामात व्यस्त पाहिजेत. मात्र, तरीदेखील खेडचे विद्यमान आमदारांनी दिवसे यांची या काळात सातत्याने भेट घेतली. मतमोजणीसाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. २८ मे रोजी बारामती मतदारसंघासाठी प्रशिक्षण असताना इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रशिक्षणाला गैरहजर राहून माझ्या आणि तहसीलदार यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात व्यस्त होते, असेही कट्यारे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter of district officials of khed to election commission regarding collector dr suhas diwas pune print news psg 17 amy