पिंपरी : शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पिंपळेनिलख परिसराचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्रात पक्षात लोकशाही नसून केवळ घराणेशाही असल्याचा आरोप त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत पिंपळेनिलख, वाकड प्रभागातून कस्पटे हे भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदा विजयी झाले. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचा आक्षेप होता. अखेरीस त्यांनी राजीनामा दिला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यायचे सोडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ताकतवर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जाते. पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून प्रभागात मताधिक्य दिले.

हे ही वाचा…पुणे : मिसरूड फुटलेल्या तिघांकडून ,व्यावसायिकावर गोळीबार

पक्षाने भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांना बसविले. परंतु, पक्षाची कार्यकारिणी करताना त्यांनी ताकतवर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना जाणून-बुजून बाजूला ठेवले. चिंचवड विधानसभेत पक्षात लोकशाही नसून घराणेशाही आहे. मी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीला वैतागून भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्यासारखे अनेक माजी नगरसेवक घराणेशाहीला, हुकुमशाहीला कंटाळले आहेत. आणखी १५ माजी नगरसेवक राजीनाम देण्याच्या तयारीत असल्याचे कस्पटे यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हे ही वाचा… पुणे :वनराज आंदेकर खून प्रकरणातील २१ आरोपींवर मोक्का कारवाई

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील गटबाजीला उधाण आले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असताना महत्त्वाच्या पदापासून डावलल्यामुळे यापूर्वी भाजपकडून निवडून आलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तुषार कामठे, माया बारणे, भाजप संलग्न कैलास बारणे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी काळात आणखी काही माजी नगरसेवक भाजपला रामराम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter to chandrashekhar bawankule alleges no democracy in chinchwad assembly only dynasticism pune print news ggy 03 sud 02