शहराच्या इतर भागात परिस्थिती समाधानकारक
आरोग्यास अपायकारक प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांच्या पातळीमध्ये एकूण पुणे शहराचा विचार केल्यास परिस्थिती अद्यापही समाधानकारक स्थितीत असली, तरी मागील दोन दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील या कणांची पातळी झपाटय़ाने वाढल्याचे भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’ या विभागाच्या दैनंदिन अहवालावरून दिसून येत आहे. शिवाजीनगरमधील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण शनिवारी (२४ नोव्हेंबर) सतर्कतेच्या पातळीपर्यंत (अत्यंत वाईट स्थिती) वाढले होते.
शहरात दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी मोठी रहदारी असलेल्या भागांमधील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. ‘सफर’च्या वतीने शहरातील विविध ठिकाणी दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टीक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म कणांचे हवेतील प्रमाण प्रामुख्याने तपासले जाते. पीएम २.५ ची हवेतील पातळी १ ते १०० मायक्रॉन असल्यास स्थिती चांगली समजली जाते. १०० ते २०० समाधानकारक, २०० ते ३०० वाईट, ३०० ते ४०० अत्यंत वाईट, तर ४०० ते ५०० मायक्रॉन प्रमाण अतिधोकादायक समजले जाते.
शनिवारी संध्याकाळी शहराच्या विविध भागात ‘सफर’ने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार शिवाजीनगर भागात पीएम २.५ अतिसूक्ष्म प्रदूषणकारी कणांचे प्रमाण ३०१ मायक्रॉन नोंदविले गेले. ‘अत्यंत वाईट’ या गटात ते मोडते. त्यामुळे ‘सफर’कडून आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला आहे. प्रदूषणकारी कणांचे हे प्रमाण हृदय, फुफ्फुसाचा विकार असणारे नागरिक, वृद्ध आणि बालकांच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाजीनगरपाठोपाठ लोहगाव, निगडी या भागातही प्रदूषणकारी कणांच्या पातळीत वाढ झाली. मात्र, त्यांचे प्रमाण सध्या तरी समाधानकारक स्थितीत असल्याचे नोंदीवरून दिसून येते