गव्हाण (ता. तासगाव, जि.सांगली) : कोरोना नंतर शहरी भागासह ग्रामीण भागांतील लहान मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोन बघण्यामुळे म्हणजेच स्क्रीन टाईम वाढल्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांचा त्रास वाढला आहे. मुलांच्या डोळ्याचा नंबर वाढल्यामुळे बहुतेक मुलांच्या डोळ्यावर चष्मे लागले आहेत. या लहान मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील गावातील तरुण मुलांनी शालेय मुलांच्या हातात लेझीम दिले. हेच लेझीम आता मुलांचा स्क्रीन टाईम कमी करत आहेत.
हेही वाचा >>> काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
शाळा सुटल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सात गावातील सुमारे पन्नास भर मुले, मुली गावातील मैदानावर पारंपारिक लेझीम खेळण्यासाठी जमतात. दीड तास मुलांना लेझीम शिकवले जाते. लेझीम खेळल्यामुळे मुलांचा व्यायाम होतो. मुले मोबाईलवर खेळण्याचे विसरून गेली आहेत. खेळून दमलेली मुल घरी येऊन तासभर अभ्यास करून पोट भरून जेवण करून झोपी जातात.
हेही वाचा >>> पुणे : सारसबाग परिसरात तरुणीचा मोबाईल हिसकावणारा अटकेत
हा प्रयोग गव्हाण गावामध्ये यशस्वी झाल्यानंतर शेजारील गावांत ही असाच प्रयोग होऊ लागला आहेत. गव्हाण हे तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एक संपन्न गाव. पूर्वी ऊस, हळद आणि आता द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमुळे गावात सधनता आली आहे. मात्र शेतीत काम करत असणाऱ्या पालकांचे मुलांकडे अपेक्षित लक्ष असत नाही. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. मोबाईल पाहून झाल्यावर मुले अभ्यास करण्यास कंटाळा करतात.
हाच स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येऊन लेझीम या पारंपारिक खेळाचे प्रशिक्षण देण्यात देण्याचा उपाय शोधला. मुळात गावात लेझीम खेळण्याची जुनी परंपरा आहे. अगदी दिल्लीपर्यंत गावातील लेझीम संघाचा बोलबाला होता. मुले लेझीम खेळायला शिकत असल्यामुळे पारंपारिक लेझीम खेळायला पुनरूज्जीवन मिळत आहे. लेझीम बरोबर दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.