‘‘पूर्वी ज्ञानार्जनासाठी केवळ पुस्तके हाच एकमेव पर्याय होता. आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाच्या एका ‘क्लिक’वर गुगलच्या माध्यमातून कोणत्याही विषयाची सारी माहिती बसल्याजागी मिळते. पण, तरीही मूळ  ग्रंथांकडे वळत विद्यार्थी आपली वाचनाची आवड जोपासत आहेत..’’
फग्र्युसन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. भी. अ. कांबळे यांनी गुरुवारी हे निरीक्षण नोंदविले. साडेतीन दशकांच्या सेवेनंतर फग्र्युसन महाविद्यालयाचे ग्रंथपाल भी. अ. कांबळे हे सोमवारी (३१ मे) निवृत्त होत आहेत. मूळचे मंगळवेढा येथील असलेल्या कांबळे यांनी पुण्यातील नौरोसजी महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात बी. ए., फग्र्युसन महाविद्यालयातून मराठी विषयात एम. ए. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठातून एम. लिब. ही पदवी संपादन केली. त्यांनी ‘तत्त्वनिष्ठ कर्ण’, ‘पुरुषोत्तम कृष्ण’, ‘पुरुषार्थबोध’, ‘करवीर नरेश शाहूमहाराज’ आणि ‘नरशार्दूल’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. १५ डिसेंबर १९८१ रोजी फग्र्युसनच्या सेवेत रुजू झालेले कांबळे यांनी सेवानिवृत्तीनंतर महाभारत-भगवद्गीता या विषयांचा अभ्यास आणि सामाजिक कामामध्ये उर्वरित जीवन व्यतीत करणार असल्याचे सांगितले.
कांबळे म्हणाले, ‘‘मी रुजू झालो त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाळ गाडगीळ हे महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यावेळी विद्यार्थी संख्या कमी होती. मात्र, महाविद्यालयाचा लौकिक वाढत राहिल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येमध्येही सातत्याने वाढ होत गेली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे मराठी वाचन संस्कृती रोडावल्याची तक्रार सातत्याने केली जाते. पण, फग्र्युसनसंदर्भात तरी मला हे विधान मान्य होणारे नाही. एक तर, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ज्ञानाची लालसा असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करण्यासाठीच्या पुस्तकांची माहिती देणे आणि त्यांची ज्ञानाची भूक भागविण्याचे काम केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची आवड अबाधित आहे, असेच मला वाटते. संगणकावर ई-बुक्सचे वाचन केले तरी अनेकदा मूळ ग्रंथातील काही भाग गाळला जातो. त्यामुळे हे वाचन सदोष असू शकते. त्यामुळे वाचनाचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी हे मूळ ग्रंथांकडेच वळत असल्याचा माझा अनुभव आहे.’’

Story img Loader