म्हशीचे दूध काढताना हॉर्न वाजविला म्हणून झालेल्या भांडणात तरुणाचा खून करणाऱ्या सहा जणांस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बबर्डे यांनी हा आदेश दिला. हवेली तालुक्यातील आगलांबे येथे १७ नोव्हेंबर २०११ रोजी ही घटना घडली होती.
अमोल अंकुश पारगे (वय २६), संतोष बबन पारगे (वय ३१), अनिल अंकुश पारगे (वय १८), गणेश रोहिदास पारगे (वय २३), बबन सोपानराव पारगे (वय ६५) आणि अंकुश बबन पारगे (वय ५३, रा. सर्व जण- आगलांबे, ता. हवेली) अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत भरत तानाजी ठाकर (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला होता, तर ज्ञानेश्वर गोविंद धसवडकर (वय २१, रा. आगलांबे) या प्रकरणी रमेश केरबा ठाकर (वय ३३, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली होती. याखटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे आणि जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यानी पंधरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि जखमींची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी हा म्हशीचे दूध काढत असताना आरोपी हा मोटारसायकलचे जोरात हॉर्न वाजवू लागला. त्यामुळे तानाजी याने ‘हॉर्न वाजवू नको, म्हैस दूध काढू देणार नाही’, असे सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. या भांडणाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी सहा जणांनी येऊन तानाजीस कोयता, कुऱ्हाड, काठय़ा, लोखंडी सळईने मारहाण केली. तर मध्ये आलेला ज्ञानेश्वर याला मारहाण केली. यामध्ये तानाजीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
चिंचवड खून प्रकरणात दोघांना जन्मठेप
बांधकामाचा ठेका घेण्याचा परवाना दिला नाही म्हणून तरुणाचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. अरुण लक्ष्मण मोरे (वय ३५) आणि विलास माणिक मोरे (वय २७, रा. इंदिरानगर चिंचवड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत अनिल भगवान पवार (वय १८) या तरुणाचा १८ जून २००९ रोजी चिंचवड येथील शिवाजी चौकात तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास डबीर यांनी १९ साक्षीदार तपासले.