पुणे : नाशिकमधील एका रुग्णालयातील मेंदूमृत रुग्णाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे अवयवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दोन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. मेंदूमृत तरुणाचे फुफ्फुस आणि एका मूत्रपिंडाचे दोन रुग्णांना यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रीन कॉरिडॉर करून नाशिकमधून केवळ अडीच तासांत हे अवयव पुण्यात आणण्यात आले.
नाशिकमधील एका रुग्णालयातील तरुणाला मेंदूमृत घोषित करण्यात आले. या तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या प्रतीक्षा यादीनुसार ही माहिती मिळताच डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टरांचे पथक नाशिकला रवाना झाले. नाशिक ते पुणे रस्त्याने अवयवांची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. अवयव प्राप्त होताच ठरावीक वेळेच्या आतच त्यांचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉरच्या योग्य व्यवस्थापनामुळे ४ तासांच्या ऐवजी हे अवयव २ तास आणि ३० मिनिटांत आणणे शक्य झाले.
हेही वाचा : प्रवाशांना खुणावताहेत रेल्वेचे ‘व्हिस्टाडोम’! वर्षभरात पावणेदोन लाख जणांचा प्रवास; २६ कोटी रुपयांचे उत्पन्न
मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ग्रस्त असलेल्या २२ वर्षीय पुरुष रुग्णाला मूत्रपिंड प्रत्यारोपण तर गेल्या चार वर्षांपासून अतिसंवेदनशील न्यूमोनिटिस आजाराने ग्रस्त असलेल्या आणि प्राणवायूवर अवलंबून असलेल्या ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आले. अवयव प्रत्यारोपण निर्धारित वेळेत त्याच दिवशी झाले. हे अवयव विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या निकषानुसार अवयवयाची गरज असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले.
हेही वाचा : भारतीय खगोलशास्त्रज्ञांची महत्त्वाची कामगिरी… शोधला २० लाख प्रकाश वर्षे अंतरात पसरलेला दुर्मीळ रेडिओ स्रोत
अवयवदान हे एक उदात्त कार्य आहे. या बहुमूल्य दानामुळे आम्ही दोन मौल्यवान जीव वाचवू शकलो. आम्ही जलद कृती करून वेळेत अवयव आणले आणि त्यांचे प्रत्यारोपण केले.
डॉ. संदीप अट्टावार, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी