बदललेली जीवनशैली, इंटरनेट, व्हॉटस अॅप, फेसबुक वरून जगाशी संपर्कात राहणाऱ्या जोडप्यांना घरातील नात्यांचा पडलेला विसर, जोडीदाराकडून वाढलेल्या अपेक्षा अशा विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये वाद होऊन संसारात फूट पडू लागली आहे. गेल्या वर्षेभरात महिला सहायता कक्षाकडे सुमारे आठशे तक्रारी दाखल झाल्या असून यामध्ये सुशिक्षितांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
किरकोळ कारणामुळे पती-पत्नीमध्ये होणारे वाद थेट घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर वर्षांनुवर्षे त्यांना न्यायालयात फेऱ्या मारण्याची वेळ येते. त्याचा मुलांसह कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच पती-पत्नीमधील वाद सामोपचाराने सोडवून त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न महिला सहायता कक्षाकडून केले जातात. कक्षामध्ये पती-पत्नीला बोलवून त्यांचे समुपदेशन केले जाते. दोघांच्या आई-वडिलांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधला जातो. त्यांच्यात असलेले गैरसमज दूर करण्याचे यातून प्रयत्न होतात. त्यांच्या तडजोडीची शक्यता नसेलच तर मग गुन्हा दाखल केला जातो. गेल्या वर्षी आलेल्या एकूण अर्जांपैकी ३९७ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली आहेत.
पती-पत्नीचा वाद असेल तर तो अर्ज महिला सहायता कक्षाकडे वर्ग केला जातो. २०१३ मध्ये या कक्षाकडे तब्बल ७८३ तक्रार अर्ज आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नोकरीमुळे घरासाठी वेळ न देता आल्यामुळे होणारी भांडणे, पती किंवा सासू-सासऱ्यांकडून हुंडय़ासाठी छळ होतो, मूल होत नसल्यामुळे पतीकडून होणारा अपमान अशा काही प्रामुख्याने तक्रारी महिलांकडून केल्या जात होत्या. मात्र, अलीकडे या कारणांबरोबरच इतर काही कारणे दिसून येऊ लागली आहेत. पत्नी नोकरी करीत असल्यामुळे आर्थिक स्थिती व्यवस्थित असते. त्यामुळे पती आणि सासू-सासऱ्यांसाठी तिच्याकडे वेळ नाही. तर, उशिरापर्यंत काम करत असल्यामुळे पतीला पत्नीसाठी वेळ नाही. त्याच बरोबर सोशल नेटवर्कीग साईटवर जगाची माहिती ठेवणाऱ्या पती-पत्नीला एकमेकांसाठी वेळ देता येत नाही, अशा काही तक्रारी दिसून आल्या आहेत. या तक्रारी घेऊन येणारी ऐंशी टक्के जोडपी ही उच्चशिक्षित आहेत, अशी माहिती महिला सहायता कक्षाच्या पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी दिली.

Story img Loader