पुणे : विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल-किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर आहे. उत्तर भारतात हवेच्या कमी दाबाच्या रेषेच्या स्वरूपात पश्चिमी विक्षोप सक्रिय आहे.
शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी आणि आणखी एक पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा प्रवाह) हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. पुढील चार ते पाच दिवस कमाल-किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…राज्यात महिनाभर अगोदरच बेदाणा निर्मिती, अवकाळीमुळे द्राक्षाचा दर्जा खालावला
मध्य भारतात गारपिटीची शक्यता
पश्चिमी विक्षोपाचा परिणाम म्हणून विदर्भ, मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमानात घट होऊन छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.