राज्याच्या विविध भागांत पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे रविवारी साजऱ्या होणाऱ्या कोजागरीच्या चंद्रावरही ढगाळ वातावरणाचे सावट राहण्याची शक्यता आहे.गुजरात आणि परिसरात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. गुजरातपासून पंजाबपर्यंत मध्य राजस्थानला छेदून जाणारी कमी दाबक्षेत्राची प्रणाली निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरातही चक्रीय चक्रवात निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. शुक्रवारी (७ ऑक्टोबर) किनारपट्टीच्या भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती होती. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे परिसरात काही भागांत अतिवृष्टी झाली. काही भागांत दिडशे मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. सांताक्रुझ केंद्रावर ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणातही बहुतांश भागांत पाऊस झाला.
हेही वाचा >>>पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसाठी लवकरच बैठक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावासाचा अंदाज आहे. विदर्भात आणखी एक दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. या विभागात त्यानंतर तुरळक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. देशात सध्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र आहे. पश्चिमी विक्षोपही निर्माण झाला आहे. त्यामुळे राजस्थान, दिल्ली, चंडीगडपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काही भागांत मुसळधार पाऊस होणार आहे.
हेही वाचा >>>पुणे : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू ; बाणेर भागात अपघात
राज्यातील तापमानात घट
राज्याच्या बहुतांश भागांत दिवसा आकाशाची स्थिती ढगाळ राहात आहे. काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊसही हजेरी लावतो आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. राज्याच्या सर्वच भागातील कमाल तापमान सरासरीखाली आले आहे. मुंबईतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी घट झाली असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भ वगळता सर्वत्र कमाल तापमान ३० अंशांखाली आले आहे. महाबळेश्वरमधील कमाल तापमानात सर्वाधिक घट असून, शनिवारी ते १९.४ अंशांपर्यंत खाली आले होते.