लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांत बाष्पाचे प्रमाण कमी होऊन हवामान कोरडे झाल्यामुळे रात्री आणि पहाटे गारवा जाणवू लागला होता. मात्र, दाना चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर हवेतील बाष्प पश्चिमेकडे येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मोसमी वारे माघारी फिरल्यानंतरही ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यभरात पाऊस कायम होता. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या क्षेत्रामुळे राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस पडला. गेल्या आठवड्याभरात पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर तापमानात वाढ होऊन काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हिट’ जाणवू लागली होती. मात्र, आता हवामान विभागाने २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, भंडारा अशा जिल्ह्यांसाठी ‘पिवळा इशारा’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसाठी ‘पिवळा इशारा’ आहे.
आणखी वाचा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर… चार देशांत होणार विद्यापीठाचे केंद्र
‘उद्या, सोमवार, २८ ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता आहे. आकाश ढगाळ होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत हवेतील बाष्प कमी झाल्याने हवामान कोरडे झाले होते. त्यामुळे गारव्याची चाहूल लागली होती. मात्र, दाना चक्रीवादळानंतर हवेतील बाष्प आता पश्चिमकडे येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत पावसाची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्यता
हवेतील धुलिकणांवर हवेची गुणवत्ता अवलंबून असते. गेल्या काही दिवसांत हवामान कोरडे झाल्यामुळे धुलिकणांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात आता दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषण वाढून हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे.