लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: अतिवृष्टी, पूर, वादळी पाऊस, विजा अशा कारणांनी गेल्या वर्षभरात देशभरात २ हजार ७७० जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १ हजार ५८० मृत्यू विजा आणि वादळी पावसामुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सर्वाधिक ५८० मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाले असून, महाराष्ट्रात २४० मृत्यू झाले.

भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाने २०२२चा हवामान अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात गेल्या वर्षभरातील पाऊस, तापमानासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा- पुणे: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

गेल्या वर्षभरात कर्नाटकात सर्वाधिक पाऊस पडला. कर्नाटकात दीर्घकालीन सरासरीच्या १३८ टक्के पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल राजस्थानमध्ये १३६ टक्के, तेलंगणात १३५ टक्के पाऊस पडला. त्यावेळी ईशान्येकडील राज्यांमध्ये कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. मिझोराममध्ये केवळ ७४ टक्के आणि मणिपूरमध्ये ७५ टक्के पाऊस पडला. गोवा, गुजरात आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या अधिक पावसाचा कल दिसून येत आहे. तर अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि बिहारमध्ये कमी पावसाला कल दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालातील माहितीनुसार २०२२मध्ये देशभरात झालेल्या २ हजार ७७० मृत्यूंपैकी १ हजार ५८० मृत्यू विजा आणि वादळी पावसामुळे झाला. १ हजार ५० मृत्यू पूर आणि अतिवृष्टीमुळे झाले. तर उष्णतेची लाट, धुळीचे वादळ अशा कारणांनी अन्य मृत्यू झाले. उत्तर प्रदेशमध्ये ५८९, बिहारमध्ये ४१८, आसाममध्ये २५८, महाराष्ट्रात २४०, ओडिशामध्ये १९४ मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा- पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्या ठार, पळसदेव नजीक अपघात

तापमानात वाढ

गेल्या शंभर वर्षातील तापमानाच्या तुलनेत देशभरातील काही राज्यांतील तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक १.५ अंश सेल्सियस तापमान हिमाचल प्रदेशात वाढले. त्या खालोखाल गोव्यात १.४४ अंश सेल्सियस, केरळमध्ये १.०५ अंश सेल्सियस तापमान अधिक नोंदवले गेले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lightning and storms caused deaths across the country last year pune print news ccp 14 mrj
Show comments