लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल ते कात्रज बोगदा दरम्यान होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी जड आणि अवजड वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा प्रतितास ६० किलो मीटरवरून ४० किलोमीटर करण्यात आली आहे.

बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात घडलेले प्राणांतिक आणि गंभीर अपघात जड आणि अवजड वाहनांमुळे झाले आहेत. अवजड वाहनचालकांचा ताबा सुटल्याने अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समितीतर्फे कात्रज बोगदा ते नवले पूल परिसराची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून जड आणि अवजड वाहनांवर वेगमर्यादा घालण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्या सूचना किंवा तक्रारी २६ मे पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.