लोणावळा : आई एकवीरा देवीची यात्रा आणि पालखी सोहळ्यानिमित्त वेहेरगाव, कार्ला, मळवली, वरसोली, वाकसई या गावांमध्ये सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला सोमवारपासून (२७ मार्च) तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंदी आदेश लागू केला आहे.
हेही वाचा – पुण्यात टपाल खात्यातील अधिकाऱ्यांकडून २४ लाख रुपयांचा अपहार
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. २७ ते २९ मार्च या कालावधीत देवीची पालखी मिरवणूक आणि महत्त्वाचे धार्मिक विधी होणार आहेत. या काळात यात्रेसाठी राज्यातून सुमारे पाच ते सहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मद्य विक्री बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, १९४९ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.