पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाने दोन कोटी ८१ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ गुन्ह्यांची नोंद केली, तसेच ४११ आरोपींना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर, १ हजार ८२३ लिटर ताडी, ३६ वाहने असा दोन कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराइतांविरुद्ध चांगल्या वर्तणुकीबाबत बंधपत्र घेण्यात आले आहे. बंधपत्रासाठी दाखल ४४२ प्रस्तावांपैकी २४८ जणांचे बंधपत्र घेण्यात आले आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार बेकायदा मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध, तसेच बेकायदा मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी ४६८ आरोपीना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १७० आरोपींना दोषी ठरविले.

हेही वाचा – पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वादग्रस्त निर्णय : एका बँकेत ९८४ कोटी अडकल्यानंतरही ठेवी पुन्हा खासगी बँकेत

प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरुद्ध एमपीडीए कायदा १९८१ अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल ४८ प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून १० आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor confiscated excise department action in the wake of lok sabha elections pune print news rbk 25 ssb