मद्यपानावर सार्वत्रिक टीकाच होत असली तरी, ओल्या पार्टीसाठी सातत्याने सण-सोहळ्याचे निमित्त धुंडाळणाऱ्या व्यक्तींची जगात कमतरता नाही. एकदा का समारंभाचा योग दिसून आला की मग या व्यक्तींचा समउत्साही गोतावळा तयार करण्याकडे कल असतो. या खरेदीत आता पेट वाईन आणि पेट बियर यांचाही समावेश झाल्यामुळे मद्यप्रेमी प्राणिपालकांची कधी नव्हे इतकी चंगळ झाली आहे. समारंभांचे किंवा पार्टीचे निमित्त आणि सवंगडी शोधण्याच्या व्यापाला टाळून आपल्या लाडक्या ‘पेट्स’सोबत मद्य रिचविण्याची सोय ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील मद्यकंपन्यांनी करून दिली आहे. यंदाच्या नववर्षसोहळ्यावेळी जगभरातील शौकिन प्राणिपालकांनी या नव्या ट्रेण्डचेही जोमाने स्वागत केले.
सुखदु:खाचा जोडीदार म्हणून ‘पेट’ पाळण्याकडे कल वाढत असल्याने प्राणिउत्पादनांची मोठी बाजारपेठ गेल्या दोन दशकभरात फोफावली. प्राणिपालकांच्या हौसेला या बाजारातील उत्पादनांमुळे मोजमापच राहिले नाही. प्राण्यांसाठी पोशाखांपासून औषधांपर्यंत आणि खेळापासून मौजेपर्यंतची सर्व खरेदी सहज करता येण्याजोगी बनली आहे. आपल्याला जे हवे ते प्राण्यांसाठीही करण्याच्या प्राणिपालकांच्या आग्रहाच्या भांडवलावर तयार झालेल्या विविध उत्पादनांच्या बाजारातून ‘मद्य’ही सुटलेले नाही. मालक आणि त्याचा जीवलग प्राणी दोघेच सुखासीन बनत मद्याचा परमानंद घेतील अशी खास प्राण्यांसाठी मद्यउत्पादने बाजारात उपलब्ध झाली आहेत. पार्टीच्या जल्लोषात घरातील मांजरे आणि श्वानांनाही सामावून घेण्याच्या उत्साहातून आता प्राण्यांसाठीच्या मेन्यूकार्डमध्ये ‘बीअर’ आणि वाईनचा समावेश झाला आहे. ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील कंपन्यांनी बाजारात पेट बिअर आणि पेट वाईनची निर्मिती केली आहे. आधीच शौकीन असलेल्या जगभरातील मद्यप्रेमी प्राणिपालकांची या निमित्ताने चंगळ झाली आहे. समाजमाध्यमांवरही सध्या या उत्पादनांच्या चर्चा रंगल्या आहेत.
भारतातही ऑनलाईन बाजारात उपलब्धता
भारतात पाळीव प्राण्यांच्या उत्पादनाच्या बाजारपेठेत ऑनलाईन बाजारपेठेचा मोठा वाटा आहे. गल्लोगल्ली आढळणाऱ्या दुकानांइतकाच फक्त प्राण्यांसाठीच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या संकेतस्थळांना भारतीय ग्राहकांचा प्रतिसाद आहे. या संकेतस्थळांवर प्राण्यांसाठीच्या बीअर्स आणि वाईन्स उपलब्ध आहेत. साधारण २५० रुपयांपासून पुढे त्याच्या किमती आहेत. काही संकेतस्थळांवर ग्राहकांचा प्रतिसाद असलेल्या उत्पादनांच्या यादीत हे प्राणिप्रेमींसाठीचे मद्य उपलब्ध आहे. नव्या वर्षांसाठी विशेष सवलतींची जंत्रीही उत्पादकांनी जाहीर केली आहे.
एकत्रित मद्यालये
प्राणी आणि त्याच्या पालकांना एकत्र बसून मद्यपानाचा आनंद घेता येईल अशी मद्यालये सुरू करण्याचा ट्रेंड सध्या जागतिक बाजारात आहे. अनेक देशांमध्ये अशी मद्यालये सुरू झाली आहेत.
प्राण्यांचे लाड आणि मद्याचा शौक हे दोन्ही सर्वसामान्यपणे चेष्टेचे विषय असले, तरीही या प्राणिपालकांवर, मद्य शौकिनांवर आणि बाजारपेठेवरही या चेष्टेचा परिणाम कधीच झालेला नाही. ‘कुणी निंदा, कुणी वंदा..’ असे नव्या उत्पादनांचा आणि सेवांचा शोध घेणे आणि बाजारपेठेने त्या पुरवणे हे चक्र सुरूच असते. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेची उडी अद्याप प्राणी आणि पालकांसाठीही एकत्रित हॉटेल्स, कॅफे यांच्यापुरतीच असली तरी येत्या काळात भारतातही प्राणी आणि त्यांच्या पालकांसाठी एकत्रित मद्यालये उभी राहिल्यास नवल नाही.
प्राण्यांच्या मद्यात वेगळे काय?
प्राण्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या या बीअर किंवा वाईन्स या ‘मद्या’च्या व्याख्येत न बसणाऱ्या. प्राण्यांसाठी अल्कोहोल अधिक हानिकारक असल्यामुळे त्यांच्यासाठी अल्कोहोल विरहित पेय तयार करण्यात आली आहेत. चिकन, भाज्या यांपासून तयार झालेली ही पेय प्राण्यांना बीअर किंवा वाईन पिण्याचाच आनंद देतील असा दावा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी केला आहे. सध्या प्राण्यांसाठी १५ ते २० बॅ्रंडसच्या बीअर आणि वाईन्स मिळतात. ब्रिटनमधील ‘वुफ अँड ब्रू’ कंपनीची चिकनचा वास आणि स्वाद असलेली श्वानांसाठी तयार करण्यात आलेली बीअर, अमेरिकेतील ‘अपोलो पीक’ या कंपनीने मांजरांसाठी बीटपासून तयार केलेली ‘ऑल नॅचरल कॅट वाईन’, बीफच्या वासाची श्वानांसाठीची ‘बोसर बीअर’, ऑस्ट्रेलियातील ‘पॉज पॉईंट’ने तयार केलेली ‘डॉग बीअर’, बेल्जियमची ‘स्नफल डॉग बीअर’ हे ब्रँड्स मद्यशौकीन प्राणिपालकांमध्ये चर्चेचा विषय आहेत.