पवना धरणाजवळ आपटी गेवंडे गावाजवळील एका बंगल्यात सुरू असलेल्या मद्य पार्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बुधवारी पहाटे छापा टाकून बारा बारबाला आणि पस्तीस तरुणांना अटक केली. छापा टाकला त्यावेळी सर्व जण मद्यधुंद अवस्थेत आढळून आले असून या सर्वाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केले होते का, हे स्पष्ट होईल. या ठिकाणाहून पोलिसांनी डीजे, विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना माहिती मिळाली की, पवना धरणाजवळ गेवंडे गावाजवळील एका बंगल्यात मद्य पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पहाटे चारला छापा टाकला. त्यावेळी सर्व जण मद्यधुंद अवस्थेत डीजेवर नृत्य करत होते. डीजेचा आवाज दूरपर्यंत येत होता. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी सर्व जण गुजराती संगीतावर नृत्य करत होते. पोलिसांना या ठिकाणी बारा बारबाला आणि पस्तीस तरुण आढळून आले. या सर्वाना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या बारबाला गुजरात, उत्तर प्रदेश, कोलकाता येथून आल्या आहेत. पकडण्यात आलेले २० ते ३० वयोगतील तरूण हे मुंबई परिसरातील आहेत. मद्याची पार्टी सुरू असलेला बंगला हा गोल्डी चोप्रा नावाच्या व्यक्तीचा असून त्याबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे  याप्रकरणी मद्याचा पुरवठा करणारे, डीजे लावणारे, पार्टीचे आयोजक अशा चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Story img Loader