पुणे : कोरेगाव पार्कमधील एका तारांकित हाॅटेलची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तारांकित हाॅॅटेलमधील मद्यालयातील बिल तसेच ऑनलाइन बुकिंगचे पैसे क्रेडिट कार्डवरुन अदा करतो, असे सांगून आरोपींनी पाच लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
योगेश बन्सल, अदित्य गुप्ता (इंद्रानगर, आग्रा रस्ता, उज्जेैन, मध्यप्रदेश), प्रणिता इंगळे (रा. मिरवत, बीड), हर्ष जेठवाणी (रा. लक्ष्मीनगर, सातारा), अंजली नथानी (रा. हरदास राम सोसायटी, गायत्रीनगर, जळगाव), राहुल शर्मा (रा. बीआरटीएस इंदूर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अरविंद कुमार सिंग (वय ४८) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हे कोरेगाव पार्कमधील ओ हाॅटेलमध्ये सरव्यवस्थापक आहेत. आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने हाॅटेलमधील खोल्यांचे बुकिंग केले होते. तारांकित हाॅटेलमधील स्काय बार रेस्टोरंटमध्ये त्यांनी महागडी दारू प्यायली. त्याचे पाच लाख ४५ हजार रुपयांचे बिल क्रेडिट कार्डने भरतो, असे आरोपींनी सांगितले होते. क्रेडिट कार्डच्या बिलाची पूर्तता न करता आरोपी हाॅटेलमधून पसार झाले. दरम्यान, आरोपींनी केलेले क्रेडिट कार्ड व्यवहार संशयास्पद असल्याचे आढळून आल्याने हाॅटेलचे सरव्यवस्थापक अरविंदकुमार सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.