पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून तस्करी करून आणलेला एक कोटी २० लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. या कारवाईत एक हजार ६६८ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडून नऊ जणांना अटक करण्यात आली. निगडी आणि नसरापूर भागात ही कारवाई करण्यात आली.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर गोव्यातील मद्य विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. गोवा, तसेच केरळमधून मद्याची बेकायदा तस्करी केली जाते. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पथके तयार केली आहेत. खासगी बसमधून गोव्यातील मद्याच्या बाटल्या विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर निगडीतील एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या थांब्यावर सापळा लावून कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोव्यातील मद्याच्या एक हजार ६६८ बाटल्या जप्त करण्यात आल्या, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपअधीक्षक सुजीत पाटील, संतोष जगदाळे उपस्थित होते.
हेही वाचा >>>जेजुरीतील सोमवती यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा अपघात; अपघातात दोघांचा मृत्यू, १३ भाविक जखमी
याप्रकरणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा चालक आणि मदतनीस यांना अटक करण्यात आली. निगडीतून मद्याच्या बाटल्या खडकी भागात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती चौकशीत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खडकी भागातून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६८ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथे केलेल्या कारवाईत ५१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एका गोदामात मद्यसाठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली हाेती. पथकाने तेथे कारवाई करुन चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मद्यसाठा जप्त करण्यात आला.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यतस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पथके तयार केली आहेत. निगडी आणि नसरापूर भागात कारवाई करुण्यात आली. या कारवाईत सव्वा कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.- चरणसिंह रजपूत, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे कार्यालय