पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. आरोग्य भरती परीक्षेतील गैरप्रकारांचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत असताना त्या तपासातून टीईटी घोटाळा उघड झाला. यात परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक आणि उमेदवारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. तपासा दरम्यान परीक्षार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचीही कसून तपासणी करण्यात आली असता ७ हजार ८८० उमेदवारांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचे उघड झाले. निकालात अपात्र असलेल्या उमेदवारांनी गैरप्रकार करून पात्र करून घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी संबंधित उमेदवारांची यादी आणि अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार परीक्षा परिषदेकडून राज्य समितीत ठरावही मंजूर करून उमेदवारांची यादी, कारवाईच्या आदेशाचे परिपत्रक परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले.
गैरप्रकार केलेल्या उमेदवारांपैकी ७ हजार ५०० उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून ते अपात्र असताना त्यांना अंतिम निकालात पात्र करण्यात आले. परीक्षांसाठी काय अंतिम निकालात अपात्र असलेल्या २९३ उमेदवारांना परीक्षा परिषदेने प्रमाणपत्र वितरित केलेले नसून, त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले किंवा तसा प्रयत्न केला आहे. ८७ उमेदवार आरोपीकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे निश्चित झालेले आहेत. त्यापैकी सहा उमेदवारांचा ७ हजार ५०० उमेदवारांमध्ये समावेश असून, उर्वरित ८१ उमेदवारांपैकी ६६ उमेदवार अंतिम निकालात अपात्र आहेत आणि तीन उमेदवार परीक्षेला अनुपस्थित होते. ७ हजार ८८० उमेदवारांपैकी सहा नावे दुबार असल्याने ७ हजार ८७४ उमेदवारांवर अंतिम कारवाई करण्यास मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.