पुणे : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका आणि संतसाहित्याच्या अभ्यासक डाॅ. तारा भवाळकर यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार तर, असंघटित आणि कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल शांताराम चव्हाण आणि नितीन पवार यांना समाजकार्याचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याची चळवळ चालविणारे कानपूर येथील अर्जक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार भारती यांना डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या वर्षीपासून साहित्य आणि समाजकार्य विभागातील पुरस्कारांना ‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार’ असे संबोधण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र फाउंडेशनचे सदस्य डॉ. सुरेश तलाठी, साहित्य पुरस्कार निवड समितीचे  समन्वयक मुकुंद टाकसाळे आणि साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ यांनी बुधवारी दिली. मासूम आणि साधना ट्रस्ट या दोन संस्थांच्या वतीने या पुरस्कारांचे संयोजन केले जाते.

हेही वाचा – पुणे : पदपथांच्या दुरवस्थेची उच्च न्यायालयाने घेतली दखल; महापालिका, महामेट्रोला दिला ‘हा’ आदेश

हेही वाचा – पुणे : वाड्यांच्या जागेवर झोपडपट्टी दाखवून बांधण्यात येणाऱ्या इमारतींना स्थगिती? महापालिकेचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

सतीश तांबे यांच्या ‘काम तमाम ॲट वाघा बॉर्डर’ (कथासंग्रह) डाॅ. कालिदास शिंदे यांच्या ‘झोळी’ (आत्मकथन) तसेच चैतन्य सरदेशपांडे यांच्या ‘उकळी’ आणि ’रविवार डायरीज’ (एकांकिका) यांना साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील निसार अली सफदर अली सय्यद आणि वैशाली निसार अली सय्यद-महाडिक यांना कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार, तर पाचगाव (ता. गोडपिंपरी, जि. चंद्रपूर) येथे सामाजिक कार्य करणारे विजय देठे यांना कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एस. एमं. जोशी सभागृह येथे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literary lifetime achievement award to dr tara bhawalkar on behalf of maharashtra foundation pune print news vvk 10 ssb
Show comments