ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे मत

इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवादित होणाऱ्या साहित्याचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या साहित्याची माहिती मिळते. मात्र, प्रादेशिक भाषांमधून मराठीत अनुवादित होणाऱ्या सहित्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने तेथील लोकसाहित्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील साहित्य मराठीमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनुवादित व्हावे, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे राजहंस प्रकाशन आणि ढोले कुटुंबीयांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात गोडबोले यांच्या हस्ते अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल रवींद्र गुर्जर यांना तसेच मुखपृष्ठकार पुंडलिक वझे आणि ग्रंथाली प्रकाशनच्या ‘बोस्कीच्या गोष्टी’ या पुस्तकास रेखा ढोले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश िहगलासपूरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे आणि प्रवीण ढोले या वेळी उपस्थित होते.

गोडबोले म्हणाल्या, वाचकांना जे आवडते तेच प्रसिद्ध करण्यावर बऱ्याचदा लेखकांचा भर असतो. अशा प्रकाराला रवींद्र गुर्जर हे अपवाद आहेत. अनुवाद क्षेत्रातील त्यांचे काम उच्च दर्जाचे असून त्यातून अनेक अनुवादकांना प्रेरणा मिळणार आहे.

गुर्जर म्हणाले, अनुवादकाला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी अनुवादकांनी एकत्रित येऊन ठोस उपाययोजना आखल्या पाहिजेत. मूळ साहित्याशी प्रामाणिक राहून मराठी भाषेचा यथोचित उपयोग केल्यास उत्तम अनुवादित साहित्य तयार होईल. अनुवादकांना एक-दोन पारितोषिके सरकारतर्फे मिळतात. त्यामुळे अनुवादक हा उपेक्षितच राहतो.

या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना पुंडलिक वझे यांनी व्यक्त केली. पुरस्कार निवड समितीच्या डॉ. कल्याणी दिवेकर, डॉ. मेधा सिधये आणि डॉ. श्रीराम गीत यांचा सत्कार करण्यात आला. जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader