‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा केवळ तरुणांचा विषय राहिला नाही, तर ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा दूर करण्यासाठीसुद्धा त्याचा उपयोग होऊ लागला आहे. सुरुवातीला असे नाते अन् मग विवाहाच्या बोहल्यावर चढतानाही ज्येष्ठ दिसत आहेत. गेल्या वर्षभरात असे सहा विवाह झालेसुद्धा..
ही स्थिती पुण्यातील. येथे ‘ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ’ गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. माधव दामले यांनी सुरुवातीला वाई येथे वानप्रस्थाश्रम सुरू केला. त्यातून या मंडळाची सुरुवात झाली. ज्येष्ठांनीही त्याला सुरुवातीपासूनच भरभरून प्रतिसाद दिला. या संकल्पनेला समाज कसा प्रतिसाद देतो, याची ज्येष्ठांना गरज वाटते आहे का, हे जाणून घेण्यासाठी सुरुवातीला या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळीच २५ पुरुष व १५ महिलांनी त्याचे सभासदत्व स्वीकारले. आता या संस्थेचे सुमारे ८० सभासद आहेत. त्यात पुरुषांची टक्केवारी अधिक आहे.
‘लिव्ह इन’ साठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक माहिती दिली जाते, विवाहपूर्व समुपदेशनही केले जाते. भागीदारीच्या करारानुसार ‘लव्ह इन’मध्ये येणाऱ्या जोडप्यांसाठी करारनामाही केला जातो. यासाठी मंडळातर्फे मदत केली जाते. इच्छुक ज्येष्ठ नागरिकांच्या मुलांना भेटणे, त्यांना या संकल्पनेची कल्पना देणे असे कामदेखील मंडळातर्फे करण्यात येते. लिव्ह इनचा पर्याय नको असेल तर मंडळात कार्यकर्ता म्हणूनही काम करता येते.
या मंडळामध्ये चाललो आहे, असे सांगणे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना अवघड जाते. त्यामुळे वयाची किमान पन्नाशी पूर्ण केलेल्या पुरुषांसाठी व महिलांसाठी दोन वेगळ्या नावाने मंडळे स्थापन करण्यात आली. त्याद्वारे एकटय़ा, एकाकी महिलांसाठी समुपदेशन, मार्गदर्शन व जरुर असल्यास योग्य जोडीदार मिळवून देणे, त्याचबरोबर व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसायात मदत, नोकरीसाठी मदत, सल्ला व मदत अशी विविध कार्य केली जातात.
सशुल्क सभासदत्वामध्ये चालविल्या जाणाऱ्या या मंडळाच्या वेळोवेळी बैठका, सहली यांचे आयोजन करण्यात येते. ‘लिव्ह’ मध्ये येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ज्येष्ठांसाठी चर्चासत्रे, बैठका, सहली यातून आपल्या जोडीदाराची निवड करणे सोपे होते. अशा पद्धतीने एकाकी, एकटय़ा ज्येष्ठांना मदत करणारी व त्यांच्यासाठी मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या या संघटनेमुळे, विवाहबंधनानंतर बंध झालेल्या जोडीपैकी एक जर भंगली, तर त्या जोडीतील ‘त्या’ने किंवा ‘ती’ने आयुष्यभर एकटे राहायचे का? या प्रश्नाला उत्तर मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा