पुणे : औषधनिर्मिती कंपन्यांची कर्बठसे कमी करण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) ‘लिव्हिंग लॅब’ सुरू करण्यात आली आहे. ‘युनायटेड किंग्डम’मधील सीपीआय आणि एनसीएल यांच्या सहकार्यातून ही सुविधा विकसित करण्यात आली असून, त्याद्वारे औषधनिर्मिती कंपन्यांना प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यातील जोखीम कमी करण्यासह हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
‘एनसीएल’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीपीआय आणि ‘एनसीएल’च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या ‘लिव्हिंग लॅब’च्या माध्यमातून सर्व भागीदारांना विदा आणि प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कमी ऊर्जा-केंद्रित आणि कार्यक्षम उत्पादन प्रक्रिया अधिक सहजपणे विकसित करणे शक्य होणार आहे. या उपक्रमात अनेक औषधनिर्मिती कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अत्याधुनिक ‘लिव्हिंग लॅब’ सुविधेमुळे विद्रावकमुक्त उत्पादन पद्धती, सातत्यपूर्ण उत्पादन पद्धती या दोन्हींची क्षमता विकसित करता येईल.
विद्रावकमुक्त उत्पादन प्रक्रियांचा समावेश केल्याने औषधनिर्मितीदरम्यान निर्माण होणाऱ्या धोकादायक कचऱ्याच्या प्रमाणात लक्षणीय घट होणे अपेक्षित आहे. अधिक पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतींमुळे भारतीय उत्पादकांसह भागीदारी करणाऱ्या कंपन्यांना अप्रत्यक्षपणे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे शक्य होईल. त्यामुळे भारतीय कंपन्यांना युरोपीयन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळू शकेल.
‘लिव्हिंग लॅब हे एक अनोखी चाचणी केंद्र आहे. भारतीय रासायनिक आणि औषध उद्योगांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लाभ मिळण्यासाठी, तसेच पारंपरिक उत्पादन पद्धतींतून नवीन पद्धतीत सहज संक्रमण करण्यासाठी या सुविधेमुळे मदत होईल. तसेच, उत्सर्जन आणि सांडपाण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्यास हातभार लागेल,’ असे ‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले यांनी सांगितले.
‘लिव्हिंग लॅब’च्या माध्यमातून उद्योगांसह सहकार्याचे एक नवीन प्रारूप करता येईल. त्याद्वारे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जाणाऱ्या प्रक्रिया विकसित करणे शक्य होईल. हा प्रकल्प औषधनिर्मिती उद्योगाचे निष्कार्बनीकरण करून उत्पादनात वाढ करण्यास मोठा हातभार लावू शकतो,’ असे सीपीआयचे मुख्य धोरण अधिकारी डॉ. अरुण हरीश यांनी नमूद केले. भारतीय रासायनिक आणि औषध उद्योगांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लाभ या सुविधेमुळे मिळेल. तसेच, पारंपरिक उत्पादन पद्धतींतून नवीन पद्धतीत सहज संक्रमण करण्यासाठीही मदत होईल, असे एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी सांगितले.