वादळी पावसामुळे कोसळलेल्या टॉवरमुळे विजेची निर्माण झालेली तूट भरून न निघाल्याने शनिवारी पुणे व पिंपरी- चिंचवडसह जिल्ह्य़ात वीजकपात करण्यात आली. विजेचे टॉवर पुन्हा उभारल्यानंतरच वीजकपातीची ही टांगती तलवार दूर होऊ शकणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस काही प्रमाणात वीजकपात करावी लागेल, असे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले आहे.
महापारेषण कंपनी व रिलायन्सचे वीज वहनाचे ११ टॉवर बुधवारी रात्री कोसळले. त्यामुळे पुणे व साताऱ्याकडे येणाऱ्या सुमारे १२०० मेगावॉट विजेवर परिणाम झाला. त्यानंतर वीजकपात सुरू करण्यात आली. शुक्रवारी विजेची मागणी कमी असल्याने वीजकपात टाळता आली. मात्र, शनिवारी पुन्हा विजेची तूट वाढली व त्यामुळे शहरातील ‘अ’ गटात दीड ते सव्वादोन तास, तर ‘ब’ गटात दोन तासांची वीजकपात करण्यात आली.
कोसळलेले टॉवर पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. महापारेषणचे टॉवर ९ जूनपर्यंत पूर्ववत होऊन परळी-लोणीकंद वाहिनी कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या वाहिनीवरील वीजवहन सुरू झाल्यास पुणे व सातारा जिल्ह्य़ातील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकेल. मात्र, रिलायन्सच्या टॉवरची उभारणी करण्यास अधिक कालावधी लागणार आहे.
शहरात आणखी दोन दिवस वीजकपात होणार
विजेचे टॉवर पुन्हा उभारल्यानंतरच वीजकपातीची ही टांगती तलवार दूर होऊ शकणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस काही प्रमाणात वीजकपात करावी लागेल, असे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले आहे.
First published on: 08-06-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Load shedding mseb mahavitaran