वादळी पावसामुळे कोसळलेल्या टॉवरमुळे विजेची निर्माण झालेली तूट भरून न निघाल्याने शनिवारी पुणे व पिंपरी- चिंचवडसह जिल्ह्य़ात वीजकपात करण्यात आली. विजेचे टॉवर पुन्हा उभारल्यानंतरच वीजकपातीची ही टांगती तलवार दूर होऊ शकणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस काही प्रमाणात वीजकपात करावी लागेल, असे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले आहे.
महापारेषण कंपनी व रिलायन्सचे वीज वहनाचे ११ टॉवर बुधवारी रात्री कोसळले. त्यामुळे पुणे व साताऱ्याकडे येणाऱ्या सुमारे १२०० मेगावॉट विजेवर परिणाम झाला. त्यानंतर वीजकपात सुरू करण्यात आली. शुक्रवारी विजेची मागणी कमी असल्याने वीजकपात टाळता आली. मात्र, शनिवारी पुन्हा विजेची तूट वाढली व त्यामुळे शहरातील ‘अ’ गटात दीड ते सव्वादोन तास, तर ‘ब’ गटात दोन तासांची वीजकपात करण्यात आली.
कोसळलेले टॉवर पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. महापारेषणचे टॉवर ९ जूनपर्यंत पूर्ववत होऊन परळी-लोणीकंद वाहिनी कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या वाहिनीवरील वीजवहन सुरू झाल्यास पुणे व सातारा जिल्ह्य़ातील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकेल. मात्र, रिलायन्सच्या टॉवरची उभारणी करण्यास अधिक कालावधी लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा