पुणे : शेतकरी शेतमालाला योग्य भाव येईपर्यंत त्याची साठवणूक वखार महामंडळाच्या गोदामात करतात. अशा मालाच्या तारणावर केवळ चार तासांत कर्जाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची योजना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राबविली आहे. त्यातून आतापर्यंत १०० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि वखार महामंडळाचे सहसंचालक अजित रेळेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्य बँकेकडून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या मूल्याच्या ७० टक्के कर्जपुरवठा ९ टक्के व्याजदराने केला जात आहे. या योजनेसाठी राज्य बँकेला महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, व्हर्ल कंपनी आणि जागतिक बँक अर्थसाहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत विकसित केलेल्या ब्लॉकचेन संगणक प्रणालीचे सहकार्य लाभले आहे. या योजनेतून बँकेने ४ हजार ५४३ शेतकऱ्यांना १०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालापोटी त्यांना कर्जाची आवश्यकता असल्यास अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वखार महामंडळाकडून केली जाते. केवायसीनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एकदाच केली जाते. हे दस्तऐवज ब्लॉक चेन प्रणालीद्वारे ऑनलाइन पध्दतीने बँकेला मिळतात. कागदपत्रांची छाननी होऊन, संबंधित गोदाम पावतीवर ऑनलाइन पध्दतीनेच बँकेच्या कर्ज बोजाची नोंद होते. त्यानंतर वखार महामंडळाने निश्चित केलेल्या मूल्याच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर आरटीजीएस अथवा एनईएफटीद्वारे कर्जाची रक्कम वितरित केली जाते. या सर्व प्रक्रियेस जास्तीत जास्त ४ तासांचा कालावधी लागतो, असे अनास्कर यांनी सांगितले.