सर्वोच्च न्यायालयाला ९ मेनंतर दीड महिन्याची उन्हाळी सुटी लागणार आहे. त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय लागल्यास पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, असा माझा अंदाज आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : प्रशांत जगताप यांना पक्ष नेतृत्वाने जाब विचारला पाहिजे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
महापालिकेत शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळी सुटी लागण्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय झाल्यास प्रभागरचना करणे, मतदारयादी करणे, नागरिकांच्या हरकती-सूचना, त्यावर सुनावणी आदी प्रशासकीय कामे पावसाळ्यात पूर्ण करता येतील. त्यानंतर निवडणूक होऊ शकेल. उन्हाळी सुटीमध्ये निवडणुकीबाबत काही याचिका आल्यास न्यायालय त्या स्वीकारणार नाही. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईल, असे मी माझे मत व्यक्त केले. दरम्यान, खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. बापट यांना जाऊन अद्याप १५ दिवसही उलटलेले नाहीत. तसेच बापट यांच्या निधनानंतरचे क्रियाकर्म झालेले नाहीत. त्यामुळे कोणाला उमेदवारी देणार, कोण येणार, हे आता बोलणे असंवेदनशीलपणाचे ठरेल, असे सांगत पाटील यांनी पोटनिवडणुकीबाबत अधिक भाष्य करणे टाळले.