सांगली : कर्नाटकातून दुचाकीने येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करून ४ लाखांचा ऐवज हस्तगत केला असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी सांगितले.पोलीस पथकाने सूतगिरणी ते कुपवाड या मार्गावर संशयितरीत्या फिरत असताना मेहंदी हसन अक्रम अली सय्यद (वय ३८, रा. हुसेन कॉलनी चदरी, बिदर, कर्नाटक) याला ताब्यात घेऊन झडती घेतली.

त्यावेळी त्याच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी, गंठन आणि दुचाकी असा ४ लाख ६ हजाराचा मुद्देमाल मिळाला. सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारले असता समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. यामुळे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सांगलीतील त्रिकोणी बाग, नागराज कॉलनी, मिरजेतील अंबाबाई रेसिडन्सी व ब्राह्मणपुरी पोस्टापासून महिलांचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली. संशयिताने मुंबईमध्येही अशाच पध्दतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Story img Loader