पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी (२४ डिसेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर गोरेंची गाडी बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल कोसळली. यात आमदार जयकुमार गोरेंसह चारजण जखमी झाले. यात जयकुमार गोरेंचे दोन अंगरक्षक, चालक आणि खासगी सचिवाचा समावेश आहे. याविषयी एका स्थानिक प्रत्यक्षदर्शीने पहाटेच्यावेळी अपघात झाल्यानंतर कोणी मदत केली, जखमींना गाडीबाहेर कसं काढलं, त्यांना रुग्णालयात कोणी दाखल केलं असा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
जयकुमार गोरेंना मदत करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, “पहाटे पावणेतीन वाजता अपघात झाला. त्यामुळे मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकल्यावर काय झालं हे पाहण्यासाठी आम्ही पहाटो सव्वातीनच्या आसपास घटनास्थळावर आलो. आम्ही घराबाहेर आलो तेव्हा जवळील महाविद्यालयाजवळ आमदार गोरे यांचे सुरक्षारक्षक ‘उठा आम्हाला मदत करा, आमचा अपघात झाला आहे’ असा लोकांना आवाज देत होते.”
“मी पोलीसच आहे, आमदार जयकुमार गोरेंना गाडीतून बाहेर काढायचं आहे”
“यानंतर ते पळत घटनास्थळावर आले आणि पुलावरून खाली, इकडं-तिकडं पाहत होते. ‘दादा वाचवा, दादा वाचवा, बघा अपघात झाला आहे’, असं म्हणत होते. तेव्हा मी घरून घटनास्थळावर आलो. त्यांना विचारलं कोण आहे? ते म्हणाले, ‘आमदार जयकुमार गोरे आहेत. ते गाडीत आहेत आणि त्यांना गाडीतून बाहेर काढायचं आहे. मी पोलीसच आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला फोन लावा.’ मी बघितलं तर ते पोलीसच होते,” अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
“आमदार गोरेंचे पीए गाडीत अडकले होते”
“काही वेळात रणजीत दादा आले होते, मग आम्ही खाली गाडीकडे गेलो. आम्ही आमदार जयकुमार गोरे यांना गाडीतून बाहेर काढलं. त्यांचे पीए गाडीत अडकले होते. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला इतर ठिकाणी मार लागला होता. त्यामुळे त्यांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी माणसं लागणार होते. आम्ही काही माणसांनी दरवाजा पकडून अखेर त्यांना गाडीतून बाहेर काढलं आणि रुग्णालयात पाठवलं,” असंही त्यांनी नमूद केलं.
अपघातानंतर स्थानिकांनी सहकाऱ्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. जयकुमार गोरेंना उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच इतरांना बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बारामतीतील डॉक्टरांनी रुग्णांचे प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.